पुणे : विधानसभेच्या निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून जन सन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेदरम्यान जुन्नर तालुका पर्यटन आढावा बैठकीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेदरम्यान एका महिला प्रतिनिधीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुम्ही गुलाबीच जॅकेट का घालता? असा प्रश्न विचारला असता अजित पवारांनी त्यावर भन्नाट असे उत्तर दिले. काय म्हणाले अजित पवार? या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी हातात एक पुष्प गुच्छ घेऊन हा गुलाबी का जॅकेटचा रंग गुलाबी असा प्रश्न विचारला, पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, गुलाबी रंग जरा खुलून दिसतो, म्हणून घालतो. उद्या महिलांनी सांगितलं की नका घालू हा कलरचा जॅकेट काढा तर काढेल. पण हा कलर जांभळा आहे. जांभूळ खाल्ल्यानंतर बियांना जो कलर असतो हा तो कलर आहे. असं उत्तर अजित पवार यांनी गुलाबी कलरच्या जॅकेटवर दिलं आहे. महायुतीत अंतर्गत वाद? दरम्यान ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. एकीकडे अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या बैठकीवर शिवसेनेनं बहिष्कार घातला तर आता दुसरीकडे अजित पवारांच्या जनसंवाद यात्रेला भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली आहे.