नवाब मलिक यांचा भाजपाला सवाल
मुंबई : मी “छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा दिलेली आहेच. मात्र तुम्ही नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करत आहात. तुमच्या पुर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला? याचे उत्तर जनतेला आधी द्या, असा सवाल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला केला आहे.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा एक रायगडावरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात होत आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना नवाब मलिक हे “छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा देत नसल्याचे या माध्यमातून पसरविण्यात येत आहे. स्वतः नवाब मलिक यांनीच या व्हिडिओतील वस्तुस्थिती सांगितली असून त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
दोन वर्षांपूर्वी शिवस्वराज्य यात्रेत रायगडावर पक्षाचे सर्व नेते एकत्र फोटो काढण्यासाठी जवळ आले होते. धनंजय मुंडे यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा केली. त्यावेळी सर्वजण जय म्हणाले, मी सुद्धा जय म्हणालो. फक्त हात वरती केला नाही.
याचा भाजपवाले अपप्रचार करत आहेत. त्यावेळीही मी “छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा दिली आणि आजही देत आहे. शासनाच्या शिवभोजन थाळीच्या उद्घाटनप्रसंगी “छत्रपती शिवाजी महाराज की जय’ बोलून सुरुवात केली होती, याची आठवण नवाब मलिक यांनी भाजपला करुन दिली आहे.