‘तुम्ही फ्यूल का बंद केलं?’ एअर इंडिया विमान अपघातातील मोठी माहिती समोर…

Air India Plane Crash | अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा १२ जूनला अपघात झाला. या दुर्घटनेत २७५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. भारतीय विमान दुर्घटना तपास अन्वेषण विभागाच्या (एएआयबी) १५ पानी प्राथमिक अहवाल सादर केला आहे. यातून अपघातामागचे नेमकं कारण समोर आले आहे.
एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिन अचानक बंद झाले होते. त्यामुळे विमानाचा वेग कमी झाला आणि ते कोसळलं, अशी माहिती समोर आली आहे.
दोन्ही वैमानिकांमधील संवाद
तसेच दोन्ही वैमानिकांमधील झालेला संवाद कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये कैद झाला आहे. कॉकपिटमध्ये एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला विचारले की, ‘तू इंधन पुरवठा का बंद केला?’ तर दुसऱ्या वैमानिकाचे उत्तर होते की, ‘मी काहीही केलेले नाही’ हा संवादही अहवालातून समोर आला आहे.
उड्डाणानंतर दोन्ही इंजिनचे फ्यूल कटऑफ स्विच रनहून कटऑफ मोडवर गेले. टेकऑफनंतर काही सेकंदांमध्ये विमानातील इमर्जन्सी पॉवर सप्लाय सिस्टिम (आरएटी) सक्रिय झाली होती. ही सिस्टिम इंजिन बंद झाल्यावर सुरु होते. अवघ्या एका सेकंदाच्या दरम्यान हा प्रकार घडला. यानंतर दोन्ही इंजिनांची थ्रस्ट क्षमता पूर्णपणे संपली. विमान उड्डाणानंतर एका मर्यादित उंचीपर्यंत पोहोचलं. मात्र ते हळूहळू खाली आले आणि मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं.
दोन्ही वैमानिकांना विमान उड्डाणाचा अनुभव
दरम्यान, विमानात २४२ जण होते. पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. तर विमान कोसळलेल्या भागातील १९ नागरिक मरण पावले. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल आणि सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर होते, दोघांनाही विमान उड्डाणाचा पुरेसा अनुभव होता. सभरवाल यांना बोईंग विमान उड्डाणाचा ८,६०० तास तर कुंदर यांना १,१०० तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता. Air India Plane Crash |
हेही वाचा:
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट





