Sobhita Dhulipala : लग्नाच्या पहिल्या वर्षी सोभिता नागा चैतन्यपासून दूर का राहिली? उघड केली सिक्रेट गोष्ट म्हणाली “काही वेळा तर…”
Sobhita Dhulipala : आपल्या संस्कृती आणि परंपरांनुसार लग्न करण्याचे तिचे स्वप्न अखेर पूर्ण झाल्याचे तिने सांगितले.

Sobhita Dhulipala : अभिनेत्री सोभिता धुलिपाला आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी डिसेंबर २०२४ मध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थित साध्या पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर जवळपास दोन वर्षांनी सोभिताने आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. एका अभिनेत्याशी लग्न करेन, असा विचार आपण कधीच केला नव्हता, असा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सोभिताने आपल्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला. आपण एखाद्या अभिनेत्याशी किंवा आपल्याच राज्यातील व्यक्तीशी लग्न करू, अशी कल्पनाही केली नव्हती, असे ती म्हणाली. मात्र, लग्नामध्ये आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब असावे, अशी तिची लहानपणापासून इच्छा होती. आपल्या संस्कृती आणि परंपरांनुसार लग्न करण्याचे तिचे स्वप्न अखेर पूर्ण झाल्याचे तिने सांगितले.
लग्नानंतर शूटिंगमध्ये व्यस्त
लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल बोलताना सोभिताने सांगितले की, डिसेंबर २०२४ मध्ये लग्न झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच तिला शूटिंगसाठी तामिळनाडूला जावे लागले. या शूटिंगसाठी ती १५० दिवसांहून अधिक काळ तामिळनाडूमध्ये होती. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या वर्षात नागा चैतन्यसोबत वेळ घालवण्याची संधी तिला फारच कमी मिळाली. काही वेळा तर महिन्यातून एकदाच दोघांची भेट होत होती असे तिने सांगितले.
२०२२ मध्ये डेटिंगच्या चर्चांना सुरुवात
नागा चैतन्य आणि सोभिता यांनी सुरुवातीला त्यांचे नाते खासगी ठेवले होते. मात्र, २०२२ मध्ये दोघांचे काही सुट्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये दोघांनी हैदराबादमध्ये एका खासगी समारंभात साखरपुडा करून नाते अधिकृत केले.
अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पार पडले लग्न
४ डिसेंबर २०२४ रोजी नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांनी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत तेलुगू पद्धतीने लग्न केले. नागा चैतन्यचे यापूर्वी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत लग्न झाले होते. २०२१ मध्ये लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघे विभक्त झाले.
सोभिता आणि नागा चैतन्याचे आगामी चित्रपट
सोभिता धुलिपाला सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. ती लवकरच सायन्स-फिक्शन ड्रामा ‘वेट्टुवम’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पा. रणजीत यांनी केले आहे. दरम्यान, नागा चैतन्य ‘वृषकर्मा’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक दांडू या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, बीव्हीएसएन प्रसाद आणि सुकुमार हे निर्माते आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली, तरी तो यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
Pune News : नेत्रदान जनजागृतीसाठी चळवळ उभारणे ही काळाची गरज : डॉ अनिल दुधभाते






