नागपूर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे युवा नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी यामागे ‘प्रकृती’चे कारण दिले आहे. सलील देशमुख यांनी आपला राजीनामा पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यासह जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे आराम करत असल्याचे सांगत, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण – ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सलील देशमुख यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. प्रकृती हे कारण असले तरी, त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘उद्याची परिस्थिती काय असेल ते माहित नाही,’ असे सूतोवाच त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना केले, ज्यामुळे ही चर्चा अधिक वाढली आहे. २०२४ विधानसभा निवडणुकीत झाला होता पराभव – सलील देशमुख हे २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. मात्र, त्यांना भाजपच्या चरणसिंग ठाकूर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. चरणसिंग ठाकूर यांना 104338 मते, तर सलील देशमुख यांना 65522 मते मिळाली होती. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीच्या कारणावरून पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. ऑगस्ट महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि माजी आमदार सुनील भुसारा यांनी नागपूरमधील मॅक्स रुग्णालयात दाखल असलेल्या सलील देशमुख यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. सध्या तरी त्यांनी प्रकृतीचे कारण देत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला असला तरी, येत्या काळात त्यांच्या राजकीय वाटचालीत काय बदल होतो, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.