बहरीन : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या धाकट्या मुलाचा, जय पवार यांचा विवाह सोहळा सध्या बहरीनमध्ये शाही पद्धतीने पार पडत आहे. या शाही सोहळ्यात अजित पवारांचा ‘झिंगाट’ गाण्यावरील ठेका सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बहरीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या लग्नसोहळ्याच्या वरातीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या लेकाच्या आनंदात सहभागी होत डान्स केला. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अजित पवार पांढऱ्या रंगाच्या शेरवानी ड्रेसमध्ये, डोळ्यावर गॉगल आणि फेटा बांधून ‘सैराट’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘झिंगाट’ गाण्यावर नाचताना दिसून येतात. एका जबाबदार राजकारण्याला ‘बापमाणूस’ म्हणून नाचताना पाहण्याचा आनंद उपस्थितांसह सोशल मीडियावर अनेकांना चांगलाच आवडला आहे. त्यांचा हा डान्स व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. पवार कुटुंबातील महत्त्वाचे चेहरे एकाच फ्रेममध्ये – जय पवार यांच्या वरातीमध्ये अजित पवारांसह त्यांचे पुतणे, आमदार रोहित पवार आणि नुकतेच विवाह झालेले युगेंद्र पवार यांची उपस्थितीही लक्षणीय ठरली. रोहित पवार यांनीही पांढऱ्या रंगाचा शेरवानी आणि डोळ्यावर गॉगल घातल्याचं दिसून येतं. पवार कुटुंबातील ही तिन्ही नेतेमंडळी एकाच फ्रेममध्ये दिसल्याने या सोहळ्याला राजकीय महत्त्वही प्राप्त झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी “जय की बारात…” असे म्हणत या लग्नसोहळ्याचे खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बहरीनमध्ये शाही विवाह सोहळा – जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा ४, ५ आणि ७ डिसेंबर रोजी बहरीनमध्ये होत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा धुमधडाक्यात पार पडला होता. बहरीनमध्ये पार पडणाऱ्या या शाही लग्नसोहळ्यासाठी पवार–पाटील कुटुंबीयांकडून केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्यातील हळदीचे फोटोही समोर आले असून, दोन्ही कुटुंबीय आणि नातलगांच्या चेहऱ्यावरील लग्नाचा आनंदोत्सव स्पष्टपणे दिसून येत आहे. खासदार शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे लग्नसोहळ्यासाठी गेल्या नाहीत. मात्र, सुप्रिया सुळेंनी जय की बारात.. असे म्हणत या लग्नाच्या वरातीचे खास फोटो शेअर केले आहेत. बहरीनची ओळख – बहरीन (अधिकृत नाव: द किंगडम ऑफ बहरीन) हा पश्चिम आशियातील पर्शियन आखातातील एक द्वीपसमूह देश आहे. हे 80 बेटांनी बनलेला आहे. तो सौदी अरेबिया आणि कतारच्या जवळ आहे. बहरीन हे एक मुक्त आणि आधुनिक मेट्रोपॉलिटन संस्कृती स्वीकारलेले राष्ट्र आहे, जिथे सर्व धर्मांचा आदर केला जातो. त्याची राजधानी मनामा आहे. लग्नासाठी बहरीनची निवड – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलगा जय पवार यांच्या शाही विवाहासाठी बहरीनची निवड करण्यामागे नेमके कारण काय होते, याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, हे ठिकाण निवडण्यामागे अंदाज असू शकतात की, बहरीन हे आंतरराष्ट्रीय आणि आलिशान विवाहसोहळ्यांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते. महाराष्ट्रातील राजकीय गजबजाटापासून दूर, परदेशात मोजक्या लोकांमध्ये हा सोहळा शांततेत पार पाडणे हा उद्देश असू शकतो. मुंबई आणि इतर प्रमुख शहरांमधून बहरीनला थेट विमानसेवा उपलब्ध आहे.