कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विशेष सघन पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) चे काम सुरू असतानाच, कामाच्या कथित ताणामुळे एका महिला बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) ने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नदिया जिल्ह्यातील रिंकू तरफ़दार (Rinku Tarafdar) असे आत्महत्या केलेल्या बीएलओचे नाव आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी एसआयआरच्या कामाचा प्रचंड दबाव हेच आत्महत्येचे कारण असल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रिंकू तरफ़दार यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट जप्त केली आहे, ज्यात त्यांनी आपल्या मृत्यूसाठी निवडणूक आयोगाला (Election Commission) जबाबदार धरले आहे. मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त – या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून दु:ख व्यक्त केले आणि “आणखी किती लोकांचा बळी एसआयआर घेणार?” असा सवाल उपस्थित केला. ‘ऑनलाईन’ कामाची माहिती नसणे ठरले घातक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रिंकू तरफ़दार यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे की, त्यांनी त्यांचे ९५ टक्के ऑफलाइन काम पूर्ण केले होते, परंतु त्यांना ऑनलाईन प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती नव्हती. सुपरवायझरला सांगूनही काही उपयोग झाला नाही. रिंकू यांचे पती असीम तरफ़दार यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला की, “हे आत्महत्या नसून आयोगाने केलेली हत्या आहे.” त्यांनी सांगितले की, रिंकू यांनी ऑफलाइन फॉर्म वाटप आणि गोळा करण्याचे काम पूर्ण केले होते, पण ते डिजिटल पद्धतीने अपलोड करण्याची त्यांना माहिती नव्हती. कामाच्या दबावामुळे लागोपाठ मृत्यू – या घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वीच बर्दवान जिल्ह्यातील मेमारी येथे कथित कामाच्या दबावामुळे नमिता हांसदा नावाच्या एका बीएलओचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे, जलपाईगुडी जिल्ह्यातील चहाच्या मळ्यात शांत मुनी ओरांव नावाच्या एका बीएलओचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणातही कामाच्या दबावाचा आरोप करण्यात आला होता. हुगळी जिल्ह्यातील एक महिला बीएलओ कामाच्या ताणामुळे ब्रेन स्ट्रोकचा शिकार झाली असून ती कोलकात्ता मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. एसआयआर रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी – दरम्यान, मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी याच आठवड्यात निवडणूक आयोगाला पत्र लिहून एसआयआर (SIR) ची प्रक्रिया अव्यवहार्य असल्याचे सांगत ती तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. महत्त्वाची सूचना: मानसिक आरोग्याच्या समस्यांवर औषधोपचार आणि थेरपी शक्य आहे. यासाठी मनोचिकित्सकाची मदत घ्या. आपण खालील हेल्पलाइन क्रमांकांवर देखील संपर्क साधू शकता: सामाजिक न्याय आणि आधिकारिता मंत्रालय हेल्पलाइन: 1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध) इंस्टीट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस: 9868396824, 9868396841, 011-22574820 हितगुज हेल्पलाइन, मुंबई: 022- 24131212