NEET paper leak – पेपरफुटीच्या आरोपांमुळे नीट-युजी 2026 परीक्षा रद्द करण्यात आल्याने पुन्हा एकदा राजकीय वादळ उठले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यात केंद्र सरकारला वारंवार अपयश येत असल्याचा आरोप गांधी यांनी केला, तसेच या संपूर्ण वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेल्या मौनाबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले. पेपरफुटीचे आरोप समोर आल्यानंतर रद्द करण्यात आलेली ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा, आता पुढील महिन्यात पुन्हा घेतली जाण्याचे नियोजित आहे. modi परीक्षांमधील वारंवार उद्भवणाऱ्या वादांवरून मोदी सरकारला लक्ष्य करताना, राहुल गांधी यांनी नीट-2024 आणि नीट-2026 मधील घटनांमध्ये समानता दर्शवली. त्यांनी म्हटले की, कोणाचीही जबाबदारी निश्चित न करता केवळ चौकशी समित्या नेमणे आणि त्याच जुन्या पद्धतीचा अवलंब करणे, हाच कित्ता सरकार पुन्हा एकदा गिरवत आहे. नीट-२०२४चा पेपर फुटला. परीक्षा रद्द झाली नाही. मंत्र्यानी राजीनामा दिला नाही. सीबीआयने चौकशी सुरू केली. एक समिती नेमण्यात आली. पुन्हा नीट-2026 चा पेपर फुटला. परीक्षा रद्द झाली. तरीही मंत्र्याने राजीनामा दिला नाही. सीबीआय पुन्हा चौकशी करत आहे. आणखी एक समिती नेमली जाईल, असे गांधी यांनी आपल्या संदेशात नमूद केले. वारंवार होणाऱ्या या चुकांनंतरही शिक्षण मंत्र्यांवर कोणतीही कारवाई का केली गेली नाही? श्री. मोदी, हा देश तुम्हाला काही प्रश्न विचारत आहे – त्यांची उत्तरे द्या! पेपरफुटीच्या घटना वारंवार का घडत आहेत? परीक्षांच्या पेपरफुटीच्या या विषयावर तुम्ही वारंवार गप्प का राहता? वारंवार अपयशी ठरणाऱ्या शिक्षण मंत्र्याला तुम्ही पदावरून का दूर करत नाही? असे गांधी यांनी लिहिले आहे.