“चित्रपटगृह मिळालं नाही की राजसाहेबांकडे येणारे मराठी कलाकार हिंदी सक्ती विरोधात गप्प का?”; संदीप देशपांडेंचा सवाल

Sandeep Deshpande | राज्यात पहिलीपासूनच अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची चर्चा सुरु असतानाच आता हिंदीच्या सक्तीविरोधात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केले आहे. यातून संदीप देशपांडे यांनी मराठी कलाकारांकडून बाळगल्या जाणाऱ्या मौनावर संताप व्यक्त केला आहे.
प्राथमिक शिक्षणापासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे. अनेक संघटना आणि राजकीय पक्ष याला विरोध करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील काही लोकांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. मात्र, काही अपवाद वगळता मराठी कलाकारांकडून याबद्दल मौन बाळगले जात आहे. यावरून संदीप देशपांडे यांनी मराठी कलाकारांना चांगलेच सुनावले आहे.
चित्रपटगृह मिळालं नाही की राजसाहेबांकडे येणारे मराठी कलाकार हिंदी सक्ती विरोधात का गप्प आहेत ? आपण कशाला राजकारणात पडा या कुपमंडूक वृत्तीतून बाहेर पडला नाहीत तर उद्योग ही मरेल आणि भाषा ही मरेल…
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 22, 2025
अनेक वेळा हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात स्क्रीन मिळत नाही. अशा वेळी मराठी कलाकार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटतात आणि मराठी चित्रपटांवर कसा अन्याय होतोय, याबद्दल बोलतात. याच मुद्द्यावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे हे मराठी कलाकारांवर संतापले.
“चित्रपटगृह मिळालं नाही की राजसाहेबांकडे येणारे मराठी कलाकार हिंदी सक्ती विरोधात का गप्प आहेत ? आपण कशाला राजकारणात पडा या कुपमंडूक वृत्तीतून बाहेर पडला नाहीत तर उद्योग ही मरेल आणि भाषा ही मरेल…,” असा इशारा संदीप देशपांडेंनी मराठी कलाकारांना दिला आहे.
राज ठाकरे यांची केंद्र सरकारच्या धोरणावर टीका
दरम्यान, “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, त्याची सक्ती महाराष्ट्रात खपवून घेणार नाही,” असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. “महाराष्ट्रात हिंदी सक्ती करणार असाल, तर दक्षिण भारतात का नाही?” असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. तसेच, हिंदीच्या सक्तीविरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा:
Shiv Sena : उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा





