DeepSeek | America : सध्या जगभरात ‘DeepSeek’ एआयची चर्चा आहे. आतापर्यंत ChatGPT, Meta, Gemini, Microsoft Copilot या जनरेटिव्ह एआय चॅटबॉटची चर्चा होत होती. मात्र, आता या सर्वांना मागे टाकत चीनच्या एआय मॉडेलने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या DeepSeek या नवीन एआय मॉडेलने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या नवीन एआय मॉडेलची लोकप्रियता एवढी वाढली आहे की, याचा परिणाम थेट जगभरातील शेअर मार्केटवर पाहायला मिळत आहे. डीपसीकने सध्या एआयमध्ये आघाडीवर असलेल्या अमेरिकन टेक कंपन्यांची झोप उडवली आहे. सध्या हे चिनी एआय स्टार्टअप जागतिक स्तरावर एआयच्या जगात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अमेरिकेचं टेन्शन चांगलचं वाढलं आहे. चीनने हे एआय मॉडेल बनवण्यासाठी केलेला खर्च खूपच कमी आहे आणि इतर विद्यमान एआय चॅटबॉट मॉडेल्सच्या तुलनेत ते अनेक बाबींमध्ये खास असल्याचे म्हटले जात आहे. तंत्रज्ञान विश्लेषकांनी असा इशारा दिला आहे की, कमी किमतीच्या चिनी पर्यायांच्या आगमनामुळे प्रस्थापित अमेरिकन एआय मॉडेल्सवर दबाव येईल. यामुळे तंत्रज्ञान कंपन्यांना त्यांच्या एआय धोरणांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले जाऊ शकते. हे एआय मॉडेल जगभरात मोफत वापरले जाऊ शकते. असं विश्लेषकांनी सांगितलं आहे. अमेरिकेला का आलं टेन्शन? वाचा… – अमेरिकेला ‘DeepSeek’मुळे समस्या येत आहेत कारण हा चिनी एआय असिस्टंट मोफत, अमर्यादित आणि ओपन सोर्स आहे. पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सर्वांसाठी एआय सुलभ बनवण्यामुळे लोक ते पसंत करत आहेत. – डीपसीकची एंट्री अशा वेळी झाली आहे जेव्हा अमेरिकेने चीनला प्रगत सेमीकंडक्टर निर्यातीवर बंदी घातली आहे. चीनची एआयमध्ये प्रगती करण्याची क्षमता मर्यादित करणे हा त्याचा उद्देश होता. पण चीनने वेगळा मार्ग शोधला. – ‘DeepSeek’ने असे मॉडेल विकसित केले आहेत ज्यांना कमी संसाधनांची आवश्यकता असते. त्यामुळे एनव्हीडिया, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या अमेरिकन टेक दिग्गज कंपन्यांच्या चिंता वाढल्या आहेत. – या कंपन्यांनी एआय पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे, या कंपन्यांना डीपसीकसारखे कमी किमतीचे पर्याय शोधावे लागतील… आणि तेही लवकरच. सध्या ‘DeepSeek’ला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. ‘डीपसीक’ कुठे डाउनलोड करायचे? चीनचे ‘डीपसीक’ अॅप कंपनीच्या वेबसाइटवरून आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवरून डाउनलोड करता येते. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये अॅपल अॅप स्टोअरवरून डाउनलोड करण्याच्या बाबतीत डीपसीक अव्वल स्थानावर आहे. डाउनलोडिंगच्या बाबतीत, त्याने ओपन एआयच्या चॅटजीपीटीला देखील मागे टाकले आहे. जगातील इतर लोकप्रिय सर्च इंजिन कोणते आहेत? चॅटजीपीटी, ओपन एआय, गुगल बार्ड, बिंग एआय, पर्प्लेक्सिटी एआय, मेटा एआय आणि युचॅट ही लोकप्रिय सर्च इंजिन आहेत. आता या यादीत ‘डीपसीक’चा देखील समावेश झाल्याचं दिसून येत आहे. ‘DeepSeek Ai’ काय आहे? जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा… अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देणारे चीनचे DeepSeek एआय काय आहे? जाणून घ्या