सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार?

डिसेंबरअखेरीस होणार निवड
कराड – कराड पंचायत समितीसाठी अडीच वर्षासाठीचे सभापतीपदाचे आरक्षण जाहिर झाले असून अनुसूचित जाती प्रवर्गातील सदस्याची सभापती, उपसभापतीपदी निवड होणार आहे. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार यावेळी आ. बाळासाहेब पाटील गटाला सभापतीपदाचा मान मिळणार आहे.
आ. पाटील गटातून उंब्रज गणातून सुषमा नागे तर तळबीड गणामधून प्रणव ताटे हे दावेदार असल्याने यापैकी नेमकी कोणाला संधी मिळेल, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मंगळवार दि. 31 रोजी सभापतीपदाची निवड असल्याने दोन दिवस अगोदरच आ. बाळासाहेब पाटील यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे.
कराड पंचायत समितीत सभापती, उपसभापतींचा अडीच वर्षाचा कार्यकाल सप्टेंबरमध्ये संपला. यानंतर पुढील अडीच वर्षासाठीची आरक्षण सोडत निघणे अपेक्षित होते. पण विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी निवडी तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ही मुदत संपताच बुधवार, दि. 11 रोजी सातारा जिल्ह्यातील पंचायत समित्यांची सभापती पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली. सभापती आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.
चोवीस सदस्य संख्या असणाऱ्या पंचायत समिती सभागृहात आ. बाळासाहेब पाटील गटाचे 7 सदस्य आहेत. यामध्ये उपसभापती सुहास बोराटे यांच्यासह सौ.शालन माळी, देवराज पाटील, रमेश चव्हाण, प्रणव ताटे, वनिता माने, सुषमा नागे यांचा समावेश आहे. उंडाळकर गटाचेही 7 सदस्य आहेत. यामध्ये सभापती सौ. फरिदा इनामदार, रमेश देशमुख, सविता संकपाळ, सुरेखा पाटील, काशिनाथ कारंडे, शरद पोळ, मनिषा पाटील यांचा समावेश आहे.
भाजप प्रणित डॉ. अतुल भोसले गटाचे 6 सदस्य आहेत.
यामध्ये सुरेश कुंभार, चंद्रकांत मदने, अर्चना गायकवाड, जयश्री जाधव, शुभांगी पाटील, बाळासाहेब निकम यांचा समावेश आहे. तर कॉंग्रेसचे नामदेव पाटील, उत्तम पाटील, वैशाली वाघमारे, नंदाताई यादव हे चार सदस्य आहेत.
पहिल्या अडीच वर्षासाठी सभापतीपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले होते. निवडणुकीत कोणत्याच गटाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आ. बाळासाहेब पाटील व उंडाळकर गटाने आघाडी कडून सत्ता स्थापन केली. या दोन्ही गटांची सदस्य संख्या समान म्हणजे प्रत्येकी 7 असल्याने सभापती पदावर दोन्ही गटाने दावा सांगितला.
बैठकीत अखेर सव्वा-सव्वा वर्षासाठी सभापतीपद घेण्याचे ठरले. पहिली सव्वा वर्षे आ. पाटील गटाला संधी देण्यात आली. तर पुढील सव्वा वर्षांसाठी उंडाळकर गटाला संधी देण्यात आली. त्यांचाही सव्वा वर्षाचा कार्यकाल सप्टेंबरमध्ये संपला. पुढील अडीच वर्षासाठीची आरक्षण सोडत बुधवार दि. 11 रोजी जाहिर झाली. सभापतीपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले. आता आ. बाळासाहेब पाटील गटाला सभापती देण्याचा मान मिळणार आहे. या गटाकडे अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रणव ताटे व सुषमा नागे हे दोन सदस्य आहेत. दोघांपैकी प्रणव ताटे हे सभापती पदाचे प्रमुख दावेदार असतील अशी चर्चा कार्यकर्त्यांमधून सुरू आहे.
ताटे यांचा विकासासाठी पाठपुरावा
गेल्या अडीच वर्षात ताटे यांनी सभागृहात मतदार संघातील प्रश्न, जनतेच्या अडचणी प्रभावीपणे मांडल्या आहेत. विकासकामांसाठी पाठपुरावाही त्यांनी सातत्याने ठेवला आहे. आ. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत आहेत. त्यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.





