नवी दिल्ली – नोव्हेंबर महिन्यात घाऊक म्हणजे होलसेल महागाई किंचित वाढली असली तरी अजूनही ती शून्य टक्क्यापेक्षा कमी आहे. नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर उणे (-) 0.32% इतका मोजला गेला आहे. ऑक्टोबर महिन्यात या महागाईचा दर उणे 1.21 टक्के इतका होता. तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये या महागाईचा दर 2.16 टक्के इतका होता. डाळी आणि भाजीपाला नोव्हेंबर महिन्यात काही प्रमाणात महाग झाल्यामुळे घाऊक महागाईच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे या कडेवारीवरून दिसून येते. खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, धातू आणि विजेच्या दरात घट झाल्यामुळे घाऊक महागाई कमी पातळीवर आहे. या आकडेवारी बद्दल बोलताना ईक्रा या संस्थेच्या मुख्य अर्थतज्ञ आदिती नायर यांनी सांगितले की, रुपयाच्या मोठ्या प्रमाणातील अवमूल्यनामुळे आणि काही वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे घाऊक महागाईचा दर काही प्रमाणात वाढला आहे. रुपयाचे अवमूल्यन अजूनही थांबलेले नाही आणि ते वाढत जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाजीपाल्याचे दर आणि इतर काही वस्तूंच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये घाऊक महागाईचा दर वाढून 0.5% वर जाण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर वाढून 0.71% झाला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये हा दर 0.25 टक्के होता. रिझर्व बँक व्याजदर ठरविताना किरकोळ महागाईचा दर विचारात घेते. किरकोळ महागाईचा दर चार टक्क्यापेक्षा बराच कमी असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून रिझर्व बँकेने व्याजदरात सव्वा टक्क्याची कपात केली आहे. व्याजदर कपात करताना रिझर्व बँकेने या संपूर्ण वर्षात किरकोळ महागाईचा जर दोन टक्के राहील असे सांगितले आहे. त्या अगोदर रिझर्व बँकेने या महागाईचा दर 2.6 टक्के राहील असे सांगितले होते. अशा परिस्थितीत आणखी एक व्याजदर कपातीला वाव असल्याचे समजले जाते.