पिंपरी | रुग्णवाहिका चालकांच्या मनमानीला आळा कोण घालणार?

पिंपरी, (प्रतिनिधी) – गंभीर रुग्णाला रुग्णालयात तातडीने पोहोचविण्यासाठी खासगी व शासकीय रुग्णवाहिका आहेत. मात्र, पिंपरी चिंचवड शहरात रुग्णवाहिकेत रुग्ण नसतानाही सायरनचा आवाज ऐकायला मिळतो.
मोकळी वाट मिळत असल्याने खासगी चालकांचा मनमानी कारभार प्रवाशांच्या डोक्याला ताप ठरत आहे. रहाटणी येथे झालेल्या रुग्णवाहिकेच्या अपघातानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अपघातातील गंभीर रुग्ण, गर्भवती माता, गंभीर आजारी रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर केला जातो. पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका मावळ, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर भागातून वायसीएम किंवा इतर खासगी रुग्णालयात येतात.
शहरात खासगी रुग्णालयांसह विविध गणेशोत्सव मंडळे, सामाजिक व राजकी कार्यकर्त्यांच्या रुग्णवाहिका आहेत. त्यावर खासगी चालकांची नेमणूक करण्यात आली आहे. रस्त्यावर रुग्णवाहिका सायरनचा आवाज करतात सुसाट धावतात.
त्यांचा वेगही बेदरकार असाच असतो. रुग्णवाहिका वेळेत पोहोचल्यामुळे रुग्णांचा जीव वाचला आहे, हे नाकारता येत नाही. काही रुग्णवाहिकांच्या काळ्या काचा असतात तर काहींना पडदे लावलेले असतात.
त्यामुळे सुसाट धावणाऱ्या रुग्णवाहिकेत रुग्ण आहे की नाही, हे कोणालाच कळत नाही. मात्र, अलीकडे रुग्ण नसतानाही सायरनचा आवाज ऐकायला मिळतो. अगदी रात्रीच्यावेळी रस्ता मोकळा असतानाही मोठ्या आवाजात सायरन वाजविला जातो.
गर्दीसह रस्त्यावर मोकळी वाट मिळत असल्याचा दुरुपयोग चालकांकडून केला जात आहे. सध्या कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती नसताना सायरनचा आवाज करीत खासगी रुग्णवाहिका सुसाट धावत सुटतात. रुग्ण नसताना सायरनचा आवाज करणाऱ्या रुग्णवाहिकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
तस्करीचाही पर्दाफाश
रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवेत येते. त्यामुळे पोलिसांकडून तपासणीचे कडक धोरण अवलंबण्यात येत नाही. त्याचा फायदा मधील काळात काहींनी दारू, गुटखा तस्करीसाठी केला होता. पोलिसांनी कारवाई करून अत्यावश्यक सेवेआड चालणाऱ्या तस्करीला लगाम लावला होता.
शासकीय रुग्णवाहिकेत रुग्ण असतानाच सायरन वाजविला जातो. रुग्ण नसल्यास सायरन वाजविला जात नाही. कुणीही रुग्ण नसताना सायरन वाजविणे चुकीचे आहे. प्रत्येकाने नियमांचे पालन केलेच पाहिजे. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकिय अधिकारी, पिं. चिं. मनपा
वाहतूक पोलीस रुग्णवाहिकेचा आवाज एकून तिला वाट करून देतात. मात्र याचा गैरफायदा कोणत्याही रुग्णवाहिका चालकाने घेऊ नये म्हणून या चालकांचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्यात येणार आहे. प्रसंगी कारवाई देखील केली जाईल. – विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

