सोमेश्वर नगर, (वार्ताहर) – बारामती लोकसभा व विधानसभा मतदारसंघ हा पवार कुटुंबीयांचा हक्काचा मतदारसंघ मात्र दोन्ही कुटुंबीयात पडलेल्या फुटीमुळे हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेला देखील या मतदारसंघांमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. बारामतीच्या राजकारणात अग्रेसर असणारा पश्चिम पट्ट्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुप्रिया सुळे यांना मोठ्या प्रमाणात साथ दिली होती. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला हा भाग कोणाच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो यावर बारामती विधानसभा विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यांमध्ये प्रामुख्याने दोन भाग पडतात एक दक्षिण पश्चिम पट्टा तर दुसरा उत्तर पश्चिम पत्ता दक्षिण पश्चिम पट्ट्यामध्ये साखर कारखाना आणि ऊस बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे अजित पवार यांचा या सहकारी संस्थांच्या माध्यमातून येथे लोकांशी जवळचा संबंध आहे. अनेक ग्रामपंचायत ,सोसायटी, आणि संस्थांचे पदाधिकारी हे अजित पवार यांच्याबरोबर आहेत. त्याचबरोबर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासारखा एक राज्यात अग्रेसर असणारा कारखाना अजित पवारांच्या ताब्यात आहे. शेतकऱ्यांच्या उस दराची कोंडी फोडण्यात सोमेश्वरची आघाडी असते आणि याचा फायदा अजित पवारांना होईल, अशी अटकळ जरी बांधली जात असली तरी अनेक जुने जाणते मंडळी, शरद पवारांच्या विचाराला अनुसरून काम करणारी माणसे शरद पवार यांच्या पाठीशी देखील उभे असल्याचे पाहायला मिळते आहे. त्याची चुणूक सामान्य मतदारांनी लोकसभा निवडणुकीवेळी दाखवून दिली आहे. त्यातच आता पश्चिम पट्ट्यातील आपल्या ताब्यात असलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी आपले कार्यकर्ते अजित पवार यांच्याबरोबर टिकवून ठेवण्यात किती यशस्वी होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर दुसरा भाग आहे, बारामती तालुक्याचा उत्तर पश्चिम भाग हा भाग प्रामुख्याने कायम दुष्काळी पट्टा आहे. मूर्ती ,मोरगाव, सुपा हा भाग कायमच दुष्काळी पट्ट्यात असला तरी हा भाग कायमच पवार कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. मात्र, आता पवार कुटुंबीयातच दोन भाग झाले असल्याने या भागातील जनता कोणाच्या बरोबर जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या भागातील लोकांची अनेक वर्षांपासून पाण्याची मागणी होती. पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणाच्या पाण्यावर या भागातील काही शेती बागायती झाली आहे. त्यामुळे या भागातील काही शेतकऱ्यांचा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची देखील मोठा संपर्क आहे. कारखान्याच्या माध्यमातून अजित पवार यांचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व या भागात असले तरी या भागातील पाण्याची समस्या मिटवण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी अजित पवार हे पूर्ण करू शकले नाहीत आणि म्हणूनच या भागात अजित पवारांवर नाराज असलेले अनेक लोक दिसून येतात. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देखील यावेळी बारामती विधानसभेला उमेदवार देण्यात येणार आहे त्यामुळे या भागात असणारा मोठ्या प्रमाणातील धनगर समाज हा राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर गेला तर याचा मोठा परिणाम दोन्हीही पवारांच्या पक्षाला होऊ शकतो. अर्थात अजित पवार यांनी या पश्चिम भागातील धनगर समाजातील काही कार्यकर्त्यांना विविध पदे देऊन आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. तरी धनगर समाजाचे एस टी प्रवर्ग समावेश अंमलबजावणीसाठी बारामती येथील झालेले आंदोलन आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता व महायुती सरकारने आंदोलनावेळी धनगर समाजाची केलेली बोळवण,यामुळे सामान्य धनगर समाज काय भूमिका घेतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पवार कुटुंबीयांच्या वतीने बारामतीच्या पश्चिम भागातील संपूर्ण वाडी वस्तीवरील मतदारांशी संपर्क साधण्यात आलेला आहे. शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने खा.सुप्रिया सुळे,युगेंद्र पवार, रोहित पवार यांनी तर अजित पवार यांच्या बाजूने खा.सुनेत्रा पवार, पार्थ पवार व जय पवार यांनी संपूर्ण वाडी वस्तीवर जात मतदारांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे मतदाराची साथ आम्हालाच मिळणार अशी दोन्ही गटाची खात्री आहे. जरांगे फॅक्टर ही ठरणार महत्त्वाचा बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये जरांगे फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरणार आहे. बारामतीच्या पश्चिम भागातील अनेक मराठा समाज हा जरांगे यांच्या बरोबर असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच हा समाज आज जरी काही बोलून दाखवत नसला तरी याचा फटका कोणाला बसू शकतो.