सातारा, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकांचे कवित्व संपल्यानंतर महायुती विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सतर्क झाली आहे.आधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या असून या विस्तारामध्ये सातारा जिल्ह्यातून भाजपच्या वतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादीच्या गोटातून आमदार मकरंद पाटील यांनाही लाल दिवा मिळू शकतो अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. लोकसभेतील मतदारांच्या नाराजीचा फटका विधानसभेत बसू नये त्यासाठी महायुतीने येथील लोकप्रतिनिधींना बूस्टर देण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत . येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू शकते मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांना मंत्रिपदाचा मान मिळणार आहे. आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी सातारा व जावळी विधानसभा मतदारसंघातून दिलेल्या निर्णयाक मताधिक्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांचा विजय सुकर झाला व आमदार जयकुमार गोरे यांनी माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी राजकीय शक्ती पणाला लावत माण तालुक्यातून त्यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले. माढा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे गेला तरी महायुतीसाठी आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांचे काम चोखपणे बजावले. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची लॉटरी यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात लागू शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांमध्ये याबाबतच्या चर्चा सुरू असून अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला जाऊ शकतो अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. वाई विधानसभा मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचार गतिमान करत उदयनराजे भोसले यांना मोठे सहकार्य केले. मात्र अपेक्षित मताधिक्य या मतदारसंघातून उदयनराजे यांना मिळू शकले नाही तरीसुद्धा आमदार मकरंद भोसले यांनी वाई तालुका आणि वाई शहर भागामध्ये उदयनराजे भोसले यांना आघाडीवर ठेवले. तरीही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून तशी नाराजी संघटन मंत्र्यांकडे नुकतीच साताऱ्यात नोंदवण्यात आली. फलटण विधानसभा मतदारसंघात आम्ही अजित दादाच्या गटाचे काम करणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे. या नाराजी संदर्भातही भाजपच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संबंधित आरोप खोडून काढत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीमध्ये जोरकसपणे काम केल्याचे नुकतेच मुंबई येथे झालेल्या बैठकीत सांगितले. आमदार मकरंद पाटील यांनाही संधी अजितदादा पवार यांनी नितीन पाटील यांना खासदारकीचा शब्द दिला होता. मात्र काही कारणास्तव राजकीय समीकरणे जुळली नाहीत. त्यामुळे वाई मतदार संघात राजकीय नाराजी आहे. ती नाराजी दूर करण्याची संधी अजितदादा सोडणार नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात आमदार मकरंद पाटील यांना संधी दिली जाऊ शकते, अशी राजकीय शक्यता वर्तवली जात आहे.