WHO Report: जगभरात वाढतंय एकटेपणाचं संकट, तरुण पिढी सर्वाधिक धोक्यात

WHO Report: जगभरात वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीत आणि डिजिटल जगाच्या धावपळीत माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. याचाच गंभीर परिणाम म्हणून जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात एकटेपणाचा वाढता धोका अधोरेखित केला आहे. या अहवालानुसार, जगातील ६ पैकी १ व्यक्ती एकटेपणाचा शिकार आहे, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत आहे.
तरुणांमध्ये एकटेपणाची समस्या तीव्र
WHO च्या सामाजिक संपर्क आयोगाने केलेल्या जागतिक सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. १३ ते २९ वर्ष वयोगटातील १७ ते २१ टक्के तरुणांनी एकटेपण जाणवत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, किशोरवयीन मुलांमध्ये ही समस्या सर्वाधिक आढळून आली.
निम्न उत्पन्न असलेल्या देशांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर असून, येथे २४ टक्के लोकांना एकटेपण जाणवतं, तर उच्च उत्पन्न असलेल्या देशांत ही टक्केवारी ११ आहे.
एकटेपणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम
अभ्यासानुसार, एकटेपण हा फक्त मानसिक त्रास नसून तो अनेक घातक आजारांना कारणीभूत ठरतो.
मानसिक आजार- डिप्रेशन, चिंता, आत्महत्येचे विचार
झोपेच्या समस्या -अनिद्रा, स्मरणशक्ती कमी होणे
शारीरिक आजार- हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्ट्रोक
आयुष्याचा धोका- अकाल मृत्यूची शक्यता वाढते

डिजिटल जग- एकमेकांना जोडणं की दुरावा?
WHO चे महासंचालक म्हणाले की, “या युगात जिथे माणसांना जोडण्यासाठी असंख्य मार्ग उपलब्ध आहेत, तिथेच अधिकाधिक लोकांना स्वतःला एकटं आणि वेगळं वाटत आहे.”
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, “तंत्रज्ञानाने जीवन बदललं आहे पण ते मानवी नातेसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी वापरणं गरजेचं आहे. अन्यथा दीर्घकाळचा एकटेपणा मानसिक व शारीरिक आरोग्यास गंभीर धोक्यात टाकतो.”
एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी उपाय
तज्ज्ञांच्या मते, एकटेपणा कमी करण्यासाठी दैनंदिन जीवनात छोटे-छोटे पाऊल उचलणं आवश्यक आहे.
मित्र, शेजारी किंवा सहकाऱ्यांशी संपर्क ठेवणं.
संवाद करताना मोबाईल बाजूला ठेवून प्रत्यक्ष संवाद साधणं.
स्थानिक गट, स्वयंसेवी संस्था, क्लब किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणं.
नियमित व्यायाम, छंद जोपासणे आणि सामूहिक उपक्रमांचा भाग होणं.
परिस्थिती गंभीर असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं.
सार्वजनिक जागांची महत्त्वपूर्ण भूमिका
WHO च्या अहवालात सार्वजनिक जागांच्या भूमिकेवर विशेष भर देण्यात आला आहे. उद्याने, शाळा, वाचनालये, सामुदायिक केंद्रे आणि धार्मिक स्थळे या ठिकाणी लोक परस्पर संवाद साधू शकतात, खेळ किंवा सांस्कृतिक उपक्रमांतून नाती घट्ट करू शकतात.
तज्ज्ञांचे मत आहे की, डिजिटल जग कितीही प्रगत झालं तरी समोरासमोर संवाद, आपलेपणा आणि भावनिक आधार हेच एकटेपणावरचं प्रभावी औषध आहे.
एकटेपण ही फक्त मानसिक समस्या नसून ती संपूर्ण आरोग्यावर परिणाम करते. वेळेत पावले उचलली नाहीत तर ही समस्या समाज आणि अर्थव्यवस्थेसाठीही मोठा धोका ठरू शकते.
एकटेपण टाळण्यासाठी खास टिप्स
1. मित्र व कुटुंबाशी संपर्क ठेवा – फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून संवाद साधा.
2. डिजिटल वेळ कमी करा – सोशल मीडियाऐवजी समोरासमोर बोलण्याला प्राधान्य द्या.
3. छंद जोपासा – संगीत, वाचन, चित्रकला किंवा कोणताही आवडता छंद सुरू ठेवा.
4. स्थानिक गटात सामील व्हा – क्लब, स्वयंसेवी संस्था किंवा क्रीडा उपक्रमात सहभागी व्हा.
5. व्यायाम व योगा करा -शारीरिक कार्यामुळे मन आनंदी राहतं.
6. शेजाऱ्यांशी संवाद वाढवा -छोटं अभिवादनसुद्धा नातं मजबूत करतं.
7. तज्ज्ञांची मदत घ्या – एकटेपण गंभीर वाटल्यास मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी बोला.


