संसदेत ई-सिगारेट ओढणारा तो खासदार कोण? पहा व्हायरल व्हिडिओ

नवी दिल्ली: संसदेच्या पवित्र सभागृहात लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक होणे अपेक्षित असताना, एका खासदाराने चक्क ई-सिगारेट (Vape) ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार कीर्ती आझाद यांच्यावर हा खळबळजनक आरोप केला असून, त्यासंबंधीचा एक व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला आहे. या प्रकारामुळे आता राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या आठवड्यात भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे एक लेखी तक्रार केली होती. संसदेच्या कामकाजादरम्यान तृणमूल काँग्रेसचा एक खासदार आपल्या जागेवर बसून उघडपणे ई-सिगारेट ओढत असल्याचे अनेक सदस्यांनी पाहिले आहे, असे ठाकूर यांनी तक्रारीत म्हटले होते. मात्र, त्यावेळी त्या खासदाराचे नाव समोर आले नव्हते.
The TMC MP accused by BJP MP Anurag Thakur of vaping inside Parliament is none other than Kirti Azad. For people like him, rules and laws clearly hold no meaning. Just imagine the audacity, hiding an e-cigarette in his palm while in the House!
Smoking may not be illegal, but… pic.twitter.com/kZGnYcP0Iu
— Amit Malviya (@amitmalviya) December 17, 2025
अमित मालवीय यांचा हल्लाबोल
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आज ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर व्हिडिओ पोस्ट करत या प्रकरणावरून टीएमसीवर निशाणा साधला. मालवीय म्हणाले की, “अनुराग ठाकूर यांनी ज्या खासदारावर आरोप केला होता, ते दुसरे तिसरे कोणी नसून कीर्ती आझाद आहेत. अशा लोकांसाठी नियम आणि कायद्यांना काहीही अर्थ नाही. सभागृहात असताना हाताच्या तळव्यामध्ये ई-सिगारेट लपवून ती ओढण्याचा उद्दामपणा त्यांनी केला आहे.”
यासोबतच मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडेही स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. “संसदेत अशा प्रकारचे वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या खासदाराच्या या गैरवर्तनावर उत्तर द्यावे,” असेही त्यांनी नमूद केले.
संसदीय मर्यादेचे उल्लंघन
अनुराग ठाकूर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, संसदेत अशा प्रकारे धूम्रपान करणे किंवा प्रतिबंधित वस्तूंचा वापर करणे हे केवळ संसदीय मर्यादेचे उल्लंघन नसून कायद्याने दखलपात्र गुन्हा देखील आहे. भारतात ई-सिगारेटवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, तरीही लोकप्रतिनिधीने असा प्रकार करणे गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ई-सिगारेट म्हणजे काय? (Vape)
ई-सिगारेट हे बॅटरीवर चालणारे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, ज्यामध्ये निकोटिनयुक्त द्रव गरम करून त्याची वाफ (Vapour) ओढली जाते. भारत सरकारने आरोग्यविषयक धोके लक्षात घेऊन देशात ई-सिगारेटच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. आता या व्हिडिओवर आणि भाजपच्या आरोपांवर तृणमूल काँग्रेस किंवा स्वतः कीर्ती आझाद काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





