प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर नगरपरिषद निवडणुकीत तालुक्याचे राजकारण तापले असून माजी आमदार अशोक पवार व विद्यमान आमदार माऊली कटके यांच्या प्रतिष्ठेची थेट लढत निर्माण झाली आहे. दरम्यान, 2007 पासून शिरूर नगरपरिषदेत निर्विवाद सत्ता राखणारे प्रसिद्ध उद्योजक प्रकाश शेठ धारिवाल यांनी अचानक घेतलेल्या माघारीच्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. धारिवाल यांच्यानंतर आता खऱ्या अर्थाने पोकळी निर्माण झाली आहे. आजी- माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या पक्षांत मुख्य लढतीचे संकेत आहेत. या निवडणुकीत भाजप, मनसे, शिवसेना (एकनाथ शिंदे) आदी पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार काय, याकडे लक्ष लागले आहे.गेल्या अनेक वर्षापासून शिरूर नगरपरिषदेवर उद्योजक प्रकाश धारिवाल यांची सत्ता अबाधित राहिली आहे. विकासकामांचा वेग, प्रशासनाशी सुसूत्र समन्वय आणि कार्यकर्त्यांवरील पकड यामुळे ‘धारिवाल पॅटर्न’ शिरूरमध्ये घट्ट रूजला होता. त्यामुळे यावेळी त्यांची अनुपस्थिती ही निवडणुकीतील सर्वात मोठी घटना मानली जात आहे. ही पोकळी धारिवाल समर्थक, कार्यकर्त्यांना जिव्हारी लागली आहे. धारिवाल यांच्या माघारीमागील कारणांबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून त्यांच्या समर्थकांची मोठी नाळ आता विविध गटांकडे वळताना दिसत आहे. प्रकाश धारिवाल यांच्या पॅटर्ननंतर पहिल्यांदाच शिरूरमध्ये सत्ता-विकासाचे नवे समीकरण तयार होत असल्याची चर्चा आहे. माजी आमदार अशोक पवार आणि विद्यमान आमदार माऊली कटके यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची टक्कर होत आहे. कार्यकर्त्यांची हालचाल आणि बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीमुळे नगरपरिषदेची ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. धारिवाल यांच्या माघारीने दीड दशके स्थिर असलेले राजकीय गणित बदलले आहे. नगरपरिषद निवडणुकीमुळे शिरूरकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पवार व कटके सक्रिय माजी आमदार अशोक पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून संघटनात्मक पातळीवर सक्रियता वाढवली आहे. तरुण कार्यकर्त्यांना एकत्र करून नगरपरिषदेवर आपली छाप निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. त्यांच्या गटाची हालचाल गतीमान झाली असून या निवडणुकीत पवार यांची प्रतिष्ठा मोठ्या परीक्षेत उतरणार आहे. तर दुसरीकडे, विद्यमान आमदार माऊली कटके हे आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी पायाभूत सुविधा व विकासकामांच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधत आहेत. सत्ता, संघटना आणि युवा मतदारांचा कल लक्षात घेऊन कटके समर्थकही मैदानात जोरदार तयारीत उतरले आहेत. ‘किंगमेकर’चा शोध सुरू प्रकाश धारिवाल यांच्या अनुपस्थितीत नगरपरिषदेचे निवडणूक रणांगण तापू लागले आहे. त्यांच्या गटातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचे राजकीय स्थलांतर सुरू असून कोणत्या गटाला त्यांचा फायदा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील व्यापारी वर्ग, महिला मतदार, तरुणांचे कल यावर यंदाचे निकाल मोठ्या प्रमाणात अवलंबून राहतील, असे संकेत मिळत आहेत.