सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरीषदेतील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदेसेनेने विजय मिळवत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. अवघ्या २२ वर्षीय शिंदेसेनेच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी भाजप उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा 170 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे. या विजयाने वस्त्रे या राज्यातील सर्वात तरूण नगराध्यक्ष ठरल्या आहेत. भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मोहोळ नगरपरिषदेच्या 20 पैकी 9 जागा शिंदेसेनेने जिंकल्या आहेत. यामुळे, मोहोळ तालुक्यात शिंदेसेनेचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. निवडणुकीपूर्वी प्रचार सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहोळमध्ये जाहीर सभा घेतली होती. निवडणूक निकालानंतर शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. मोहोळ तालुक्यात शिंदेसेनेने भाजपला दिलेला हा धक्का जिल्ह्याच्या राजकारणात नवी दिशा देणारा ठरू शकतो. सिद्धी वस्त्रे 22 व्या वर्षी नगराध्यक्षा.. विशेष म्हणजे, सिद्धी वस्त्रे या केवळ 22 वर्षांच्या असून, राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्षांपैकी एक ठरल्या आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने मारलेली ही मुसंडी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सिद्धी वस्त्रे यांच्या रूपाने एका तरुण चेहऱ्याला संधी देऊन शिवसेनेने मतदारांना आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धी वस्त्रे यांनी जनतेचे आभार मानले. जनतेने दिलेला हा कौल माझ्यावरील विश्वास दर्शवतो. निवडणुकीच्या काळात अनेक टीका झाल्या, पण आजचा निकाल हेच त्या टीकेला उत्तर आहे. लोकांच्या समस्या सोडवणे आणि शहराचा सर्वांगीण विकास करणे हीच माझी प्राथमिकता असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.