Shahrukh Khan | Vivek Oberoi : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत एक धक्कादायक पण वास्तववादी मत व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काळ जसजसा पुढे जातो तसतसे सुपरस्टार्सही इतिहासाच्या पानांमध्ये हरवून जातात आणि पुढच्या पिढीला त्यांची आठवणही राहत नाही. उदाहरण देताना त्यांनी म्हटले की, आजपासून २५ वर्षांनंतर लोक कदाचित शाहरुख खानलाही ओळखणार नाहीत. मुलाखतीत विवेक म्हणाले, “१९६० च्या दशकातील कोणत्या चित्रपटात कोण होते, आजच्या पिढीला त्याचा काहीही फरक पडत नाही. तुमचा काळ संपला की तुम्ही इतिहासात नोंदले जाता. २०५० मध्ये कदाचित लोक म्हणतील, ‘शाहरुख खान कोण?’” “आज अनेक तरुणांना कदाचित हेही माहिती नसते की राज कपूर कोण होते. आपण त्यांना सिनेमा देव मानतो, पण रणबीर कपूरचे फॅन्स असलेल्या तरुण पिढीला ते माहिती असेलच असे नाही. इतिहास आपल्याला शेवटी ‘काहीच नाही’मध्ये रुपांतरित करतो.” विवेक ओबेरॉय यांनी त्यांच्या बॉलिवूडपूर्व संघर्षाच्या काळाबद्दलही खुलासा केला. 2002 मध्ये राम गोपाल वर्मांच्या ‘कंपनी’ चित्रपटातून त्यांनी दमदार सुरुवात केली. पण त्याआधी त्यांनी फराह खान यांच्या सेटवर रिहर्सल रूम साफ करणे, बॅकग्राऊंड डान्सर्ससाठी चहा घेऊन जाणे अशी कामे केली होती. “मी प्रशिक्षणासाठी फराह खान यांना खूप मदत केली. मी रिहर्सल रूम साफ करत होतो, सर्व डान्सर्ससाठी चहा आणत होतो. मी कधीही कुणाला सांगितले नाही की मी सुरेश ओबेरॉयंचा मुलगा आहे.” विवेक ओबेरॉयचे आगामी प्रोजेक्ट्स : विवेक लवकरच कॉमेडी फ्रेंचायझीच्या पुढील भागात, म्हणजेच ‘मस्ती 4’ मध्ये दिसणार आहेत. मिलाप जावेरी दिग्दर्शित या चित्रपटात रितेश देशमुख, आफताब शिवदासानी, एलनाज नौरौजी, रूही सिंह, श्रेया शर्मा, शाद रंधावा, निशांत सिंह मलकानी आणि नतालिया जानोसजेक महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.