लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान वारंवार अपघात होत आहेत. या अपघातात अनेक जीव जात आहेत तर काही प्रवासी गंभीर जखमी होत आहेत. या अपघातांना कारणीभूत ठरणार्या रस्त्यांवरील धोक्यांकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. ही वाहतूक कोंडी हा खूपच ज्वलंत प्रश्न आहे. या प्रश्नावर मात करण्यासाठी उपाययोजनांची जबाबदारी पुणे महानगरपालिका, ’पीएमआरडीए’, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, संबंधित ग्रामपंचायती आणि वाहतूक पोलीस या सहा विभागांवर आहे. ते एकत्रित आले, तरच यावर तोडगा शक्य आहे. वेगाने महानगर होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या पुणे शहराचे पूर्व प्रवेशद्वार असलेल्या या महामार्गावर आतापर्यंत दुर्लक्ष केल्यामुळेच वाहतूकीचा खेळखंडोबा झाला आहे. पुण्यातून 5 राष्ट्रीय महामार्ग, तर 10 पेक्षा अधिक राज्यमार्ग गेले आहेत. या 5 राष्ट्रीय महामार्गांपैकी पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडीची अवस्था खूप बिकट झाली आहे. हडपसर ते उरुळी कांचन या दरम्यान होणार्या वाहतूक कोंडीत नागरिकांचा श्वास गुदमरला आहे. पुणे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग, पुणे – सोलापूर लोहमार्ग, वेगवेगळ्या शिक्षण संस्था यामुळे या परिसरात नागरीकरणाचा वेग प्रचंड आहे. मोठ्या वाहनांची ही वर्दळ वाढली आहे. या परिसरात कामगार, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी यांच्या वापराच्या दोनचाकी, चारचाकी वाहने, उस वाहतूकीचे ट्रॅक्टर आदी वाहनांची संख्या वाढली आहे. या कोंडीतून रुग्णवाहिकाही सुटत नाही. एकाच दिवसात पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर असे देवदर्शन उरकून पुन्हा परतण्याची अनेकांना घाई असते. यामुळे झोप न घेता वाहन चालविण्याचे प्रकार होतात. चालकाला लागलेली एक डुलकी अपघाताला निमंत्रण देते. वाहनांचा अतिवेग, महामार्गाच्या बाजूला चुकीच्या ठिकाणी गाडी उभी करणे, यू टर्नला ओव्हरटेक करणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे आदी अपघाताची कारणे आहेत. अपघातांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी ही प्रशासनासह नागरिकांची देखील आहे वाहतूक शाखेसह प्रशासन उदासीन चौकाचौकात वाहतूक कोंडी होते हे माहित असताना ही समस्या मार्गी लावण्याबाबत पोलीसांची वाहतूक शाखेसहित इतर सर्व संबंधित शासकीय विभाग एवढे उदासीन का आहेत? अनेक चौक वाहतूक नियमनात नापास झाल्याने मुख्य रस्त्यावर असलेली वाहनांची पार्किंग, बेशिस्त वाहतूक, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष अशा अनेक कारणांनी वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे. या परिसरात अनेक जीवघेणे अपघात होत आहेत. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही संबंधित यंत्रणा, राजकीय नेते, अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधीं निवांतच आहेत. किरकोळ जखमी झालेले बरेच अपघात बाहेरच्या बाहेर नुकताच भरपाई देऊन मिटवले जातात. अशा अपघातांची नोंद पोलीस दप्तरात होत नाही. गरज पडल्यास पोलीस आधिकारी व कर्मचारी यांची संख्या वाढवणे, पार्किंग बाबत पी 1, पी 2 सारखे उपाययोजना करणे, बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणे, त्याबरोबरच वाहतूकीचे नियम पाळण्या बाबतीत वाहन चालकांचे प्रबोधन करणे आदी उपाय तातडीने योजण्याची गरज आहे. स्वप्नात नव्हे; वास्तवतेत रहा पुणे-सोलापूर महामार्गावर एलिव्हेटेड कॉरिडोर पूल होणार, त्यावर मेट्रो जाणार, रिंग रोड होणार अशा प्रकारची स्वप्न पूर्व हवेलीतील नागरिकांना गेल्या 30-40 वर्षांपासून दाखवली जात आहेत. ही स्वप्न प्रत्यक्षात कधी येतील ती येऊ द्या. मात्र सध्या वाहतूक कोंडी ही समस्या झाली आहे. ही समस्या तातडीने सोडवा. एलिव्हेटेड कॉरिडोर पूल, मेट्रो, रिंग रोड हे व्हायला पुढची शंभर वर्षे लागू द्या; परंतु आता ही वाहतूक कोंडी सोडवा, अशी आर्त हाक पूर्व हवेलीतील नागरिक देत आहेत.