सुपे, (वार्ताहर) – काही दिवसातच आचारसंहिता लागेल. आचारसंहितेनंतर सुरू होणार्या विधानसभेच्या रणधुमाळीला जिरायत भागाचा कौल कोणाच्या बाजूने असेल ? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विधानसभेला विजयी होणार्या उमेदवाराला निर्णयक मतदान हे जिरायत भागातूनच मिळणार असल्याची चर्चा रंगत आहे. लोकसभेला मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आता विधानसभेला कोणती गणित आखणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतीच नागरिकांनी आपण स्वतः उमेदवारी जाहीर करावी असे सांगितल. लोकसभेसारखे गाफील न राहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत असे चित्र तालुक्यात आहे. जिरायत भागात प्रचार करताना उमेदवारांना वर्षांनवर्षे जिरायत भागाच्या पाचवीला पुजलेल्या पाणी प्रश्नाला तोंड द्यावे लागते. पूर्वी होणार्या निवडणुकीत फक्त निवडणूक लक्षात घेता निवडणुकीपुरता उमेदवार रिंगणात उतरवायचे. आता मात्र एकाच घरातले दोन्हीही उमेदवार असणार हे मात्र नक्की आहे. अशातच जिरायत भागातील लोकांचा जो उमेदवार पाणी प्रश्न मिटवेल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असा लोकांच्या मनातला सूर आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, घोंगडी बैठका, गाव संपर्क दौरा यावर पक्षांचा प्रचंड जोर आहे. सार्वजनिक नवरात्र उत्सवात अनेक मंडळांच्या भेटीगाठी हा सुद्धा कार्यक्रम सुरू आहे. थोडक्यात सामान्य कार्यकर्त्यांना थेट उमेदवारांशी संपर्क साधायची संधी या निमित्ताने उपस्थित झाली आहे. शेतीला पाणी, युवकांना रोजगार, रिकाम्या हाताला काम या माफक अपेक्षा जिरायत भागातील आहेत आणि या जो पूर्ण करेल त्याच्या पाठीशी इथला शेतकरी उभा राहणार असल्याचे सांगितले जात आहे.