मुंबई : मराठी साहित्य विश्वातील क्रांतिकारी कवी तथा दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चल हल्ला बोल हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) या चित्रपटाला परवानगी नाकारल्यामुळे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक जुलै 2024 पासून बोर्डाच्या दारात चकरा मारत आहेत. या प्रकरणी साहित्यप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मराठी व हिंदी भाषेतील या 2 तासांच्या चित्रपटाद्वारे 1970 ते 1975 च्या कालखंडातील युवा क्रांती दल व दलित पँथरच्या चळवळीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटाला जगभरातील 262 फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले आहे. त्याला अनेक पुरस्कारही मिळालेत. पण भारतातच सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी नाकारल्यामुळे निर्माते हैराण झाले. सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी रेवणकर व सय्यद रबी हश्मी यांनी निर्मात्यांना पाठवलेल्या एका नोटीसीत नामदेव ढसाळ कोण हेच आम्हाला माहिती नसल्याचा अजब दावा केला आहे. नामदेव ढसाळ कोण आहेत? हे आम्हाला माहिती नाही. त्यांच्या कविता चित्रपटातून वगळल्या तर सेन्सॉर बोर्ड चित्रपटाला परवानगी देण्यावर विचार करू शकतो, असे त्यांनी म्हटले. बोर्डाच्या या भूमिकेमुळे चित्रपट निर्माते बुचकळ्यात पडलेत. हा चित्रपटच मुळात नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे त्यांच्या कविता कशा वगळणार? असा विचित्र प्रश्न त्यांच्यापुढे उभा टाकला आहे. ढसाळांच्या कविता चित्रपटाचा आत्मा नामदेव ढसाळ यांच्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे. त्यांच्या कविता या चित्रपटाच्या आत्मा आहेत, असे चित्रपट निर्माते महेश बनसोडे या प्रकरणी म्हटले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास विलंब होत असल्यामुळे निर्मात्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामु्ळे त्यांनी या प्रकरणी कायदेशीर लढा देण्याचे संकेत दिलेत. …तर अधिकाऱ्यांनी राजिनामे द्यावेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. सेन्सॉर बोर्डावर बसणारे जे कोणते महाभाग आहेत, त्यांना नामदेव ढसाळ माहिती नसतील तर त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी तातडीने राजीनामा देणे योग्य राहील, असे ते म्हणालेत.