कोण आहेत मनोज जरांगे पाटील? जाणून घ्या…

जालना : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. तसेच या प्रकरणी विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे-पाटील नेमके कोण आहे असा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांचे वय 41 वर्षे आहे त्यांचे मूळ गाव शहगड आहे. ते मराठा मोर्चाचे समन्वयक असून गेले 20 वर्षे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. जरांगे-पाटील हे बघता बघता मराठी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाऊ लागले. जालना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद चालून आले.
या पदाला त्यांनी योग्य न्याय दिला; पण २००३ला जेव्हा जेम्स लेन प्रकरणाचा वाद पेटला, तेव्हा पक्षाशी त्यांचे मतभेद झाले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणताही तडजोड होणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी २०११ला त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. या संघटनेचा मराठवाड्यात विस्तार केला.
2012 साली शहागडमध्ये आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 7 दिवसाचं आमरण उपोषण केले. 2013 साली शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी सहा दिवस उपोषण केले होते. अंबड तहसील कार्यालयासमोर तब्बल 11 वेळा त्यांनी उपोषण केले आहे. मागील 2 वर्षात जालन्यातील साष्टपिंपळगाव, भांबेरी, वडीकाळ्या आणि आता अंतरवली सराटीत पाच दिवसांपासून उपोषण केले.





