वसई-विरार : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत झालेल्या पराभवानंतर अवघ्या वर्षभरातच घेण्यात आलेल्या वसई-विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये या महापालिकेवर असलेले वर्चस्व कायम ठेवत वसई-विरार महापालिकेचा गड बविआने राखला आहे. स्थानिक राजकारणात वसई-विरार हा भाग बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला मानला जातो आणि या बालेकिल्ल्याचे केंद्रबिंदू आहेत हितेंद्र विष्णू ठाकूर. स्वतंत्र राजकीय वाटचाल, स्थानिक स्वराज्य संस्थांवर मजबूत पकड आणि आक्रमक भूमिका यामुळे हितेंद्र ठाकूर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘धुरंदर’ म्हणून ओळखले जातात, आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.. हितेंद्र ठाकूर कोण आहेत? हितेंद्र ठाकूर यांचा जन्म १९६१ साली वसईत झाला. राजकारणात येण्यापूर्वी ते आपल्या भावासोबत डेअरी फार्म व्यवसाय करत होते. १९८८ साली रिअल इस्टेट व्यावसायिक सुरेश दुबे हत्या प्रकरणात त्यांचे बंधू जयेंद्र उर्फ भाई ठाकूर यांच्यावर आरोप झाले होते. या घटनेमुळे ठाकूर कुटुंब पहिल्यांदाच राज्यपातळीवर चर्चेत आले होते. काँग्रेसपासून स्वतंत्र राजकीय प्रवास हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. वसई तालुका युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. १९९० साली वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी ते वसई-विरार मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. यानंतर त्यांनी काँग्रेसपासून वेगळा मार्ग स्वीकारत ‘वसई विकास मंडळ’ या नावाने स्वतंत्र पक्ष स्थापन केला. पुढे या पक्षाचे नाव बदलून बहुजन विकास आघाडी (BVA) करण्यात आले. आतापर्यंत हितेंद्र ठाकूर चार वेळा आमदार म्हणून निवडून आले असून पालघर जिल्ह्यात त्यांची मोठी राजकीय ताकद आहे. वसई-विरार महानगरपालिकेवर बविआची सत्ता बहुजन विकास आघाडीचे वसई-विरार महानगरपालिकेवर सत्ता, वसई तालुका पंचायत समिती, पालघर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती या सर्व ठिकाणी वर्चस्व आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठाकूर यांची एकहाती सत्ता आणि प्रभाव स्पष्टपणे दिसतो. क्षितीज ठाकूर कोण आहेत? क्षितीज ठाकूर हे हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र असून ते नालासोपारा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २००९ पासून ते सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी पोलीस अधिकारी व शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा यांचा पराभव केला होता. नालासोपाऱ्यात त्यांची मजबूत पकड आहे. पोलीस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण २०१३ साली वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलनाक्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी क्षितीज ठाकूर यांची कार अडवली होती. यावेळी दोघांत वाद झाला. यानंतर विधीमंडळ अधिवेशनादरम्यान सूर्यवंशी विधानभवनात आले असता क्षितीज ठाकूर यांनी मारहाण केल्याचा आरोप झाला. या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांचाही सहभाग असल्याचा आरोप होता. आमदाराकडून पोलिसाला मारहाण झाल्याच्या आरोपामुळे हा मुद्दा राज्यभर गाजला. फौजदारी खटले आणि कोट्यवधींची संपत्ती निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार हितेंद्र ठाकूर यांची जंगम मालमत्ता : सुमारे ३९ कोटी रुपये पत्नीची जंगम मालमत्ता : २३ कोटी रुपये हितेंद्र ठाकूर यांची स्थावर मालमत्ता : सुमारे ४६ कोटी रुपये पत्नीची स्थावर मालमत्ता : २४ कोटी रुपये हितेंद्र ठाकूर स्वतः व्यावसायिक असून त्यांच्या पत्नीही व्यवसाय करतात.