छत्रपतींच्या महाराष्ट्रात किराणा दुकानात दारू विक्रीचा अधिकार कोणी दिला?

लोणंद – महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वरांचा आहे. त्यांच्या या महाराष्ट्रात तुम्हाला किराणा मालाच्या दुकानातून मद्यविक्री सुरू करण्याचा अधिकार कोणी दिला? असा संतप्त सवाल करत शिवव्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. लोणंद येथे नगरपंचायत पटांगणात शिवजयंतीनिमित्त मराठा समाज मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाची प्रारंभी मान्यवरांकडून शिवप्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
श्रीमंत कोकाटे म्हणाले, इथे भूमिपुत्रांचे एतद्देशीयांच्या हिताचे राज्य निर्माण झाले पाहिजे, ही प्रेरणा अठरापगड जाती, बारा बलुतेदार, सर्व धर्मियांना सोबत घेऊन जनसामांन्यात रुजवण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केले. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात दारूला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होऊ दिली नाही. कोणी महाराष्ट्रातील किराणा दुकानात दारू विक्री सुरू करत असेल तर अशांना महाराज हयात असते तर सरळ तुरुंगात डांबले असते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष लोणंदच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मधुमती पलंगे-गालींदे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांना एका जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, देशाच्या चौकटीत बंदिस्त करता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राजे आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर यांनीही शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक राज्यकारभारावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
लोणंद येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिलराजे निंबाळकर यांनी शिवव्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमात आराध्या बागवडे, अनुष्का पवार, धनश्री चव्हाण, आयुष मिसाळ, आदिराज भोसले या चिमुकल्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांची मने जिंकली. कु. आदित्य रविकांत भोसले या चिमुकल्याने नुकतेच राज्यस्तरीय अंकनाद स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कोकाटे यांच्या हस्ते त्याचा सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच मंडळाचे माजी अध्यक्ष शंभूराज भोसले यांच्या संगठण कौशल्यासाठी सपोनि विशाल वायकर यांच्याहस्ते गुणगौरव करण्यात आला.
शिवव्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांचा सत्कार मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष दशरथ मारूती इंदलकर यांच्या हस्ते केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगराध्यक्षा मधुमती पलंगे-गालिंदे यांचा सत्कार सौ. सरस्वती आनंद कदम यांनी केला. प्रमुख पाहुणे सपोनि विशाल वायकर यांचा सत्कार मंडळाचे उपाध्यक्ष शुभम संजय दरेकर यांनी केला. स्वागत व प्रास्ताविक हेमंत जयवंत निंबाळकर यांनी, तर सूत्रसंचालन शंभूराज भोसले आणि रोहित निंबाळकर यांनी केले.





