भरधाव वडाप वाहतुकीवर नियंत्रण कोणाचे?

वाहनांसह चालकांचे परवाने तपासणी आवश्‍यक

कोपर्डेहवेली – गेल्या काही दिवसांपासून कराड-मसूर मार्गावर अत्यंत भरधाव वेगाने प्रवासी वाहतूक करणारी वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या सुसाट चालणाऱ्या वाहतुकीला आवर न घालता पोलीस प्रशासन सोईस्करपणे डोळेझाक करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कराड ते मसूर या मार्गावर बेशिस्त चालणाऱ्या वाहतुकीमुळे या मार्गावर किरकोळ अपघातांची नोंद न होणे, चालकांचा व वाहनांचा परवाना आहे की नाही इतपत शंकास्पद बाबी समारे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मोठे अपघात झाल्यास त्याचा त्रास प्रवाशांसह वाहनधारकांनाही बसणार आहे.

एसटीच्या तुलनेत वडाप वाहतूक सध्या तेजीत आहे. बेरोजगारांना उत्पन्नाचे साधन म्हणून हा व्यवसाय रास्त आहे. परंतु वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे यातही अच्छे दिन राहिलेले नाहीत. याचा परिणाम म्हणून स्पर्धा वाढल्याने जास्त फेऱ्या होण्यासाठी चालकांचा प्रयत्न असतो. वाढता इंधन खर्च तसेच रोजची ठराविक रक्कम वाहनमालकास देऊन उर्वरित रक्कम जेमतेम राहते. हा त्यांचा रोजचा अनुभव आहे. यासाठी स्वत:सह प्रवाशांचा जीव धोक्‍यात घालून वाहन क्षमतेपेक्षा जादा प्रवासी घेण्याच्या व जादा फेऱ्यांच्या स्पर्धेत वेगावर ताबा राहत नाही.

आपापसांत नंबर लावण्यासाठी चढाओढ सुरू असते. हा रस्ता अवजड वाहनांच्या रहदारीचा आहे. त्यातच सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असल्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. वाढत्या जीवघेण्या स्पर्धेमुळे भविष्यात मोठ्या अपघाताची शक्‍यता स्थानिकांतून व्यक्त होत आहे. यासाठी वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण रहावे, अशी मागणी नियमित प्रवाशांकडून होत आहे.

शहापूर, पिंपरी फाटा ते सह्याद्री कारखाना परिसरात कायम वर्दळ असते. शिवाय उत्तर कोपर्डे गेट जवळ असणारे वळण धोकादायक असून या ठिकाणी वाहनावर ताबा ठेवण्यासाठी चालकांना कसरत करावी लागत आहे. येथे वारंवार अपघात होत असतात. कित्येकदा पोलिस प्रशासनाला या अपघातांची कल्पनाही नसते. स्थानिक नेतेमंडळी आणि संबंधितांमध्ये तडजोडीने तक्रारी मिटतात. तसेच या परिसरात कराड, मसूर व तळबीड पोलिस स्टेशनच्या हद्दीची नेमकी ठिकाणे समजत नाहीत. तसे फलक लावणे अत्यंत गरजेचे असल्याचेही प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.

बेशिस्त वाहतुकीला आळा कोण घालणार

वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता त्याप्रमाणे पोलीस यंत्रणेकडून वाहतुकीबाबत ज्या उपाययोजना करायला हव्या आहेत. त्या काहीही केलेल्या दिसत नाहीत. यामुळे कराड-मसूर या मार्गावर बेशिस्त वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येते. या बेशिस्त वाहतुकीचा इतर प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.