पुणे, {अंजली खमितकर} – भारतीय जनता पक्षाचा तब्बल २५ हून अधिक वर्षे बालेकिल्ला असलेल्या कसबापेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत आणि आताच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा अटातटीचा सामना होण्याची चिन्हे आहेत. भाजपकडून हेमंत रासने, कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गणेश भोकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्कालीन आमदार मुक्ता टिळक यांच्या अकाली मृत्यूनंतर दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपचा हा बालेकिल्ला सर केला. त्यानंतर त्यांनी लोकसभाही लढवली. मात्र, आता हा बालेकिल्ला ते आमदार म्हणून टिकवून ठेवतील का ? पोटनिवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यात रासने यांना यश मिळते का ? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपच्या गिरीश बापट यांनी १९९५ च्या विधानसभेत विजय मिळवला आणि पुढील २५ वर्षे या मतदारसंघावर आपली पकड भक्कम ठेवली. २०१४ मध्ये भाजपच्याच मुक्ता टिळक या कसब्यातून आमदार झाल्या. त्यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकरांनी भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांचा पराभव केला. राज्यातील सत्ताबदलानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याने आणि पहिल्यांदाच एकही बंडखोर उमेदवार नसल्याने झालेल्या थेट लढतीत भाजपचा पराभव झाला. परंतु, आता महाविकास आघाडीतले अजित पवारच महायुतीत प्रमुख सरदार झाल्याने, त्याचा फायदा होईल की तोटा हे देखील येत्या काळात समजणार आहे. कॉंग्रेसपक्षातून अनेकांनी कसब्यातून लढण्याची तयारी दाखवली. मात्र, विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली. भाजपने मात्र रासने यांचा एकदा पराभव झाला असतानाही त्यांची दीड वर्षांत केलेली तयारी पाहून आणि पराभवाची सल भरून काढण्यासाठी संधी दिली आहे. कसबा पेठेत मनसेला मतदान करणाराही मतदार वर्ग आहे. त्यामुळे गणेश भोकरे यांचे कार्ड किती चालते, याचीही उत्सुकता आहे. भोकरे यांनी गेल्या काही काळात जनसंपर्कही वाढवला आहे. अन्य इच्छुकांची नाराजी, पण… “ब्राह्मण उमेदवार द्या’ अशी मागणी पोटनिवडणुकीच्या वेळीही जोरदारपणे करण्यात आली होती. याही वेळी ती करण्यात आली होती. तोच पत्ता इच्छुक उमेदवार धीरज घाटे, गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट आणि मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांनीही काढला होता. मात्र, त्याचा विचार झाला नाही. त्यामुळे अन्य इच्छुक आणि मतदारांची समजूत काढताना भाजप पक्षश्रेष्ठींची तारेवरची कसरत होणार का, अशी चर्चा आहे. मतदारसंघात मिश्र मतदार कसबापेठ विधानसभा मतदारसंघाची रचना संमिश्र स्वरुपाची असून सदाशिव पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, टिळक रस्ता भागांत ब्राह्मण समाजाचे प्राबल्य आहे. तर उर्वरित पेठांमध्ये बहुजन वर्गातील मतदारांची संख्या अधिक आहे. कसबापेठेतील आतापर्यंतचे बहुसंख्य आमदार हे ब्राह्मण समाजाचे होते. सध्या शहरात ब्राह्मण समाजाचा एकही आमदार नाही. परिणामी, कसब्यातून ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी मागणीही झाली होती. त्यामुळे आता जनता कोणाला कौल देईल आणि बहुसंख्येने असलेला ब्राह्मण समाज यंदा उमेदवार पाहील की, पक्षाच्या चिन्हाकडे पाहील हे लवकरच स्पष्ट होणार आहे.