पिंपरी | कोण आलारे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला!

पिंपरी, (प्रतिनिधी) – कोण आलारे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला ! अशा विविध विजयी घोषणांनी शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्या विजयी हॅटटि्रकचा बालेवाडी क्रीडा संकुलात जल्लोष करण्यात आला. बारणेंचा विजय दृष्टीपथास येताच उपस्थित शिवसैनिक, समर्थक व कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे हा परिसर विजयी घोषणांनी दणाणून गेला होता.
सुरुवातीपासूनच बारणे यांनी मताधिक्क्यामध्ये आघाडी घेत, शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली. या लक्षवेधी लढतीचा निकाल द़ृष्टीक्षेपात येताच शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला. त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. बारणे यांनादेखील विजयाची खात्री पटल्याने ते स्वत: समर्थकांसह दुपारी दोनच्या सुमारास बालेवाडी क्रीडा संकुलात दाखल झाले.
त्यानंतर आर्किड हॉटेल प्रवेशद्वाराजवळ जमलेल्या शिवसैनिकांनी शेंदूराची मुक्त उधळण केली. त्यानंतर बारणे यांनी विजयी हॅटट्रीकचा स्विकार करत, विजयी रथासह निवासस्थानाकडे रवाना झाले. मार्गक्रमणादरम्यान अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी शेंदूर उधळत त्यांच्या विजयाचा जल्लोष केला.
केंद्रीय राज्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार
गेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर दुसर्यांदा विजयी झालेले श्रीरंग बारणे यांचे केंद्रीय राज्यमंत्री पदाकरिता शिवसेनेकडून नाव चर्चेत होते. शिवसेनेतील राजकीय फुटीनंतर पुन्हा त्यांच्या नावाची चर्चा होती.
मात्र, पुन्हा त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाने हुलकावणी दिली. आता विजयाची हॅटट्रीक करणारे श्रीरंग बारणे हे केंद्रीय राज्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार समजले जात आहेत. शिवसेनेतून त्यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळण्याची दाट शक्यता आहे.





