Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मंगळवारी मुंबईत पीडी हिंदुजा रुग्णालयाने आयोजित केलेल्या ‘सेव्हिंग लाइव्ज अँड बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी मार्गदर्शन केले. काय म्हणाल्या राष्ट्रपती? राष्ट्रपती मुर्मू यांनी खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांना स्पष्ट संदेश दिला की आरोग्यसेवा देताना केवळ व्यवसाय नव्हे, तर सामाजिक जबाबदारीचेही भान ठेवा. सर्वांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे आपले सामूहिक ध्येय असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. स्वस्थ भारत घडवण्यासाठी केवळ सरकार नाही, तर सर्व घटकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. तंत्रज्ञान आणि AI ची भूमिका महत्त्वाची – वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर वाढत असून येत्या काळात त्याची भूमिका आणखी महत्त्वपूर्ण होणार आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. निदानापासून उपचारापर्यंत प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘मेक इन इंडिया’ आरोग्यसेवेला पोषक – औषधे आणि वैद्यकीय उपकरणे देशातच तयार झाल्यास सामान्य नागरिकांना स्वस्तात उपचार मिळणे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मेक इन इंडिया आणि PLI सारख्या योजना यासाठी उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पात नागरिकांचे आरोग्य हा पाया आहे. वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळाल्यासच हे स्वप्न साकार होईल, असे राष्ट्रपतींनी सांगितले. मुंबईत राज्यपालांसह मान्यवरांनी केले स्वागत – राष्ट्रपती मुर्मू मंगळवारी दुपारी मुंबईत दाखल झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि महापौर ऋतु तावडे यांनी त्यांचे स्वागत केले.