राहाता -सध्या करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण आहे. अशाही परिस्थितीत पोलीस आपली भूमिका चोख बजावत आहेत. अशा आणिबाणीच्या काळातही राहाता येथील शिवाजी चौकामध्ये आपले कर्तव्य पार पाडत असताना त्याठिकाणी राहाता नगरपरिषदेने लावलेल्या झाडांना पाणी घालून सहायक पोलीस उपनिरीक्षक कंडारे आपला वृक्षसंवर्धनाचा छंद जोपातसत आहेत. काही दिवसांपूर्वी राहाता नगरपालिकेचे कर्मचारी टॅंकरद्वारे शहरातील झाडांना पाणी घालत होते.
याच वेळी अचानक सहायक पोलीस उपनिरीक्षक कंडारे यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या हातातून पाण्याचा पाईप घेतला व आपल्या हाताने नगरपरिषद कार्यालयाने जी झाडे लावली त्यांना पाणी देण्यास प्रारंभ केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या पोलीस हे सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करीत आहेत व आपले घरदार सोडून 24 तास कर्तव्य निभावत आहेत. अशातच राहाता पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्ष कडारे यांनी कर्तव्यावर असतानाही आपला वृक्षसंवर्धनाचा छंद जपला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.