मुंबई : राज्यात महाविकास आघाडीमुळे भाजपाला सर्वाधिक आमदार असूनही सत्तेपासून दूर राहावे लागले. भाजपाची हीच नाराजी अजूनही कायम असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमुळे हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतानाच शिवसेनेला स्वाभिमानावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे : चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत!#BalasahebThackeray
#बाळासाहेबठाकरे pic.twitter.com/TPVfnA6sKn— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2021
राज्यात भाजपाच्या नेत्यांकडून शिवसेनेला वेगवेगळ्या मुद्द्यावरून नेहमीच चिमटे काढण्यात आले. हिंदूत्वापासून ते स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यापर्यंत अनेक मुद्दे भाजपाकडून उपस्थित केले गेले आणि शिवसेनेला धारेवर धरण्याचा प्रयत्न झाल्याचेही अनेकदा दिसले. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊ एका वर्षापेक्षा अधिक काळ लोटून गेला असला, तरी भाजपाची शिवसेनेवरील नाराज कमी झाली नसल्याचेच पुन्हा एकदा समोर आली आहे.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांची भाषणातील काही विधाने असलेला एक व्हिडीओ ट्विट करत अभिवादन केले. मात्र, सत्ता आणि स्वाभिमान यांच्या संदर्भातीलच विधाने या व्हिडीओत घेतलेली आहेत. त्यामुळे भाजपाचं सत्ता गमावण्याचे शल्य अजूनही कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांनी शिवसेनेला स्वाभिमानावरून डिवचण्याचा प्रयत्नही व्हिडीओच्या माध्यमातून केल्याचं दिसत आहे.