कलंदर: कोणता झेंडा घेऊ हाती?

उत्तम पिंगळे

प्राध्यापक दोन दिवस गावी गेले होते. काल त्यांच्या घरी भेटलो. त्यांचे गाव म्हणजे तालुक्‍याचे मुख्य ठिकाण व विधानसभा मतदारसंघही. गावात निवडणुकीची धामधूम सुरू होती. पण म्हणावे तशी घाईगडबड नव्हती. त्यांची व त्यांच्या मित्राची अगदी निवांत भेट झाली. एक दिवस सकाळीच त्यांच्याकडे गेले व दुपारी जेवून सायंकाळी परत आले. दुपारच्या जेवणानंतर गप्पाटप्पांमध्ये मुख्य विषय दोन होते एक म्हणजे अवकाळी पाऊस व त्यामुळे तालुक्‍यात झालेले शेतीचे नुकसान. मग सरकारी यंत्रणा व शेतीचे पंचनामे कुठे कमी जास्तीची तफावत त्यावरील आक्षेप. दुसरा अर्थातच निवडणूक. सरांनी तर मला या वेळची निवडणूक वेगळीच वाटत असल्याचे सांगितले.

सर म्हणाले, तालुक्‍याच्या ठिकाणी तसे मुख्य चार उमेदवार उभे आहेत पण प्रचार म्हणावा तसा नाही. सर्वत्र थंड प्रचार दिसत आहे. कुठे थोडेफार पोस्टर, झेंडे लावलेले आहेत; पण जास्त गडबड दिसत नाही. केवळ आपल्याच तालुक्‍यात नाही तर पूर्ण राज्यात कमी अधिक प्रमाणात हेच चित्र दिसत आहे. कागदावर युती आघाडी इतर आघाड्या स्वतंत्र बंडखोर असे अनेक प्रवाह असले तरी एकूणच कार्यकर्ते संभ्रमात आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे नेतेच संभ्रमात आहेत. काहींनी आपला पक्ष वा गट बदलला आहे. अनेक नेत्यांनी त्यांच्या पक्षात पत्ता कट झाला म्हणून विरोधी गटात जाऊन काहींनी तिकीट मिळवले आहे. अशावेळी तेथील नियोजित उमेदवाराला पड खाऊन आयारामांना तिकीट दिले म्हणून नाराजी आहे. काही ठिकाणी आजी आमदारांस तिकीट नाकारून नवीन चेहरा दिला असल्यामुळे आमदारांचे कार्यकर्ते नाराज आहेत. काही ठिकाणी युती वा आघाडी असूनही दुसऱ्या पक्षात जागा मिळाल्यामुळे त्या पक्षाच्या उमेदवाराने थेट अपक्ष म्हणून रिंगणात उडी मारली आहे.

आता पक्षाने तिकीट न दिल्यामुळे लढणारे अपक्षांच्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे की पक्षाच्या उमेदवारांबरोबर जायचे की अपक्ष लढणाऱ्या नेत्याबरोबर. तसेच आघाडी व युतीमुळे काही जागांची अदलाबदल झाल्यामुळे तिथल्या नेत्याने थेट अपक्ष म्हणून उमेदवारी घोषित केल्यामुळे त्याच्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झालेला आहे.

प्राध्यापक पुढे म्हणाले की, यावेळी युती आघाड्या काही ठिकाणी आपल्याच माणसाला अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यास फूस देत आहेत असे वाटते. त्यामुळे निवडणूक लढवणारे अधिकृत उमेदवारही गॅसवर असून डोळ्यात तेल घालून प्रचार करत आहेत आणि म्हणूनच कार्यकर्ते संभ्रमात आहेत. सरकार असताना किंवा सवंग लोकप्रिय निर्णय घेताना अर्थशास्त्र बाजूला केले जाते. पण या वेळी निवडणुकीच्या रिंगणात अर्थशास्त्राचे नवे राजकारण घडवू पाहात, असे वाटण्यास जागा आहे. म्हणूनच उघड उघड प्रचार न होता तोही अत्यंत गुप्ततेने होत आहे असे वाटते. कोण कुठे बाजी मारणार याचे गणित दिसत आहे तसेच असेल असे नव्हे. अनेक धक्‍कादायक निर्णय लागण्याची शक्‍यता वाढली असून असे धक्‍कादायक निकाल लावण्याचे आडून प्रयत्न होत आहेत. आपला उमेदवार निवडून येण्यापेक्षा दुसऱ्याचा कसा जिंकेल यासाठी पडद्याआडून काही ठिकाणी वरच्या आशीर्वादाने प्रयत्न होत आहेत असा संशय आहे. म्हणूनच सामान्य कार्यकर्त्याला प्रश्‍न पडला आहे, “कोणता झेंडा घेऊ हाती’?

Leave A Reply

Your email address will not be published.