Global Peace Index: २०२६ मध्ये जगातील सर्वांत सुरक्षित देश कोणते? भारत कितव्या स्थानावर? पाहा संपूर्ण यादी
Global Peace Index दरवर्षी ‘इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस’ (IEP) या संस्थेकडून ‘ग्लोबल पीस इंडेक्स’ म्हणजेच जागतिक शांतता निर्देशांक प्रसिद्ध केला जातो.

Global Peace Index: आजच्या काळात परदेशात प्रवास करण्यापूर्वी बहुतेक लोक सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व देतात. मग तो एकट्याने केलेला प्रवास असो, कुटुंबासोबतची सुट्टी असो किंवा व्यावसायिक दौरा असो, प्रत्येकाला सुरक्षित आणि शांत वातावरण असलेल्या देशांना भेट द्यायची इच्छा असते. त्यामुळे जगातील सर्वांत सुरक्षित देश कोणते आणि भारत या यादीत कुठे आहे, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते.
दरवर्षी ‘इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस’ (IEP) या संस्थेकडून ‘ग्लोबल पीस इंडेक्स’ म्हणजेच जागतिक शांतता निर्देशांक प्रसिद्ध केला जातो. या अहवालामध्ये जगातील देशांची सुरक्षितता, राजकीय स्थिरता, गुन्हेगारीचे प्रमाण, अंतर्गत संघर्ष, दहशतवादाचा धोका आणि लष्करी परिस्थिती यांसारख्या विविध निकषांच्या आधारे क्रमवारी निश्चित केली जाते.
२०२६ च्या अहवालानुसार, जगभरातील शांततेमध्ये सलग १२ व्या वर्षी घट झाल्याचे समोर आले आहे. अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती, सीमावाद आणि अंतर्गत संघर्ष वाढल्यामुळे जागतिक शांततेवर परिणाम झाला आहे. मात्र, या आव्हानात्मक परिस्थितीतही काही देशांनी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
या यादीत आइसलँडने पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे सलग १९ व्या वर्षी आइसलँड जगातील सर्वांत सुरक्षित आणि शांत देश ठरला आहे. कमी गुन्हेगारी, राजकीय स्थैर्य आणि शांत जीवनशैली ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत.
दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंड आहे. सुंदर नैसर्गिक वातावरण, सुरक्षित सार्वजनिक व्यवस्था आणि उच्च जीवनमानामुळे हा देश पर्यटकांचा आवडता ठरतो. तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड आहे. स्वच्छता, उत्कृष्ट प्रशासन, सुरक्षितता आणि तटस्थ परराष्ट्र धोरणामुळे या देशाला विशेष ओळख मिळाली आहे. यानंतर स्लोव्हेनिया आणि आयर्लंड या देशांचा क्रमांक लागतो. हे दोन्ही देश कमी गुन्हेगारी आणि राजकीय स्थैर्यासाठी प्रसिद्ध आहेत.

India
ऑस्ट्रिया आणि पोर्तुगाल हे देशही सुरक्षिततेच्या बाबतीत आघाडीवर आहेत. सार्वजनिक सुरक्षा, सामाजिक स्थैर्य आणि शांत जीवनशैलीमुळे हे देश जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात.
आशियातील सिंगापूरनेही टॉप १० मध्ये स्थान मिळवलं आहे. कठोर कायदे, उत्कृष्ट वाहतूक व्यवस्था आणि शिस्तबद्ध प्रशासनामुळे सिंगापूर हा आशियातील सर्वांत सुरक्षित देशांपैकी एक मानला जातो.
फिनलंड आणि जपान यांनीदेखील टॉप १० मध्ये स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे जपानने यावर्षी तीन स्थानांची झेप घेत आपली कामगिरी सुधारली आहे.
दरम्यान, भारताच्या क्रमवारीत मात्र घसरण झाली आहे. २०२६ च्या ग्लोबल पीस इंडेक्समध्ये १६३ देशांच्या यादीत भारत १२७ व्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये भारत ११५ व्या स्थानावर होता. म्हणजेच भारत १२ स्थानांनी खाली घसरला आहे. अहवालानुसार, सीमावर्ती भागातील तणाव, अंतर्गत संघर्ष आणि काही सुरक्षा विषयक आव्हाने ही भारताच्या क्रमवारीतील घसरणीची प्रमुख कारणे आहेत.
दुसरीकडे, रशिया, सुदान, काँगो, युक्रेन आणि इस्रायल हे देश जगातील सर्वांत कमी शांतता असलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. या देशांमध्ये सुरू असलेले संघर्ष आणि अस्थिरता याचा त्यांच्या क्रमवारीवर मोठा परिणाम झाला आहे.
एकंदरीत, सुरक्षित आणि शांत देशांमध्ये प्रवास करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही यादी उपयुक्त ठरू शकते. मात्र, कोणत्याही देशात प्रवास करण्यापूर्वी त्या ठिकाणची सद्यस्थिती, सरकारी प्रवास सूचना आणि स्थानिक नियम यांची माहिती घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.





