पुणे – महापालिका निवडणुका जाहीर होताच माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी प्रभागात फिरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांच्या प्रशासकीय कारभारात नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागला. त्यातच, महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत चार सदस्यांच्या प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी संपूर्ण प्रभागात विकासकामे न करता इतर सदस्यांच्या संमतीने प्रभागाचे तुकडे करून ठराविक भागातच कामे केली. त्यामुळे आता नागरिकांकडून एवढे दिवस कुठे होता? असा थेट सवाल इच्छुकांना केला जात आहे. या रोषामुळे अनेक इच्छुकांना रात्रीच्या वेळी प्रभागांच्या हद्दी तपासण्यासाठी बाहेर पडण्याची वेळ आली आहे. मतदारांचा थेट रोष महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत चार सदस्यांच्या प्रभागात निवडून आलेल्या नगरसेवकांनी संपूर्ण प्रभागात समान विकासकामे न करता आपापसात विभागणी केली. त्यानुसार, पाच वर्षे प्रत्येक नगरसेवक फक्त आपल्या भागातच काम करीत राहिला. त्यामुळे इतर भागातील समस्यांकडे दुर्लक्ष झाले. नागरिकांनी तक्रार केल्यास तो भाग माझा नाही, त्या भागातील सभासदांशी बोला असे उत्तर देण्यात आले. परिणामी, प्रभागात असमान विकास झाला. आता प्रभाग रचना बदलल्याने अनेकांनी कामे केलेला भाग इतर प्रभागात गेला आहे. त्यामुळे इच्छुक माजी नगरसेवक म्हणून लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, मतदार थेट एवढे दिवस कुठे होता? आता आमची आठवण झाली का? असा सवाल करीत असल्याने अनेक इच्छुकांना संकोच वाटू लागला आहे. तीन वर्षे कुठे होता? महापालिकेच्या निवडणुका २०२२ मध्ये होणे अपेक्षित होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाची सुनावणी सुरू असल्याने त्या गेल्या तीन वर्षांपासून त्या रखडल्या. या कालावधीत महापालिकेवर प्रशासक कारभार सुरू होता. नागरिकांना दैनंदिन समस्या आणि छोट्या कामांसाठीही मनस्ताप सहन करावा लागला. अशा वेळी नागरिकांनी माजी नगरसेवकांकडे धाव घेतली असता त्यांनी, आम्ही नगरसेवक नाही, प्रशासन काम करीत नाही, त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, असे सांगून हात वर केले. आता मात्र निवडणुका आल्यावर तेच नगरसेवक मतदारांच्या भागात हात जोडत फिरताना दिसत आहेत. त्यामुळे मतदार तीन वर्षे कुठे होता? असा खोचक सवाल करीत असून, अनेक इच्छुक खासगीतच आपली व्यथा व्यक्त करीत आहेत.