‘जिथे अन्याय, तिथे शिवसेना’ : ऊर्मिला मातोंडकर

पुणे – प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केली. “जिथे अन्याय, तिथे शिवसेना’ कायम लोकांसोबत आहे. प्रबोधनकार ठाकरे यांची लेखणी कोणत्याही लोभाला बळी पडली नाही. त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून आपल्याला नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास प्रबोधनकार ठाकरे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर यांनी व्यक्‍त केली.

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या “प्रबोधन’ पाक्षिकाच्या शताब्दीनिमित्त “संवाद पुणे’तर्फे आयोजित “प्रबोधन महोत्सवा’चे उद्‌घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मातोंडकर बोलत होत्या. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, शिवसेना उपनेते, प्रबोधन युवा मंचचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, सुनील महाजन, शिवसेनेचे उपशहरप्रमुख किरण साळी, निकिता मोघे, सचिन इटकर उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेचे हिंदुत्व प्रबोधनकारी विचारांचे आहे. येथे जीवन व्यवस्थेला स्थान नाही. परंतु अंधश्रद्धा, रुढी आणि परंपरा आज डिजिटल माध्यमातून पुन्हा समाजासमोर येत आहेत. अशावेळी प्रबोधनकारांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यासाठी अधिकाधिक नवीन माध्यमांचा वापर करणे गरजेचे आहे.

खरे प्रबोधनकार समाजापुढे आणले पाहिजेत, अशी आग्रही भूमिका मांडून डॉ. बाबा आढाव म्हणाले, प्रबोधनकारांनी अनेक विचारांच्या धाग्याने समाजाची बांधणी केली. आपण विचार करायचा, लोकांना विचार करायला लावायचा आणि तो मांडायचा असे प्रबोधनकारांचे सूत्र होते.

शिवसेना मराठी भाषिकांच्या पाठिशी…
कन्नड अस्मितेच्या नावाखाली फडतूस संघटनांनी स्वत:ची मर्यादा सोडून मुद्दाम महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागामध्ये चिथावणी देणारी परिस्थिती निर्माण केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. कर्नाटकमधील मराठी भाषिकांच्या हितासाठी शिवसेना कायम खंबीरपणे पाठीशी आहे, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि कर्नाटकमधील भाजपच्या राज्य सरकारने याबाबत कठोर भूमिका घ्यायला हवी होती. सीमा भागामध्ये सुरू असलेला गोंधळ हा स्थानिकांचा नसून यामागे कर्नाटकमधील राजकीय लोक आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.