पुणे -जिल्ह्यात साखर कारखान्यांकडून बॉयलर अग्नि प्रदीपन झाल्यानंतर कारखान्यांकडून गाळप हंगामाचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले. मात्र, यंदाच्या गळीत हंगामात ऊस दराची कोंडी पुणे जिल्ह्यात फोडण्याचे धाडस कोणत्याही साखर सम्राटांकडून करण्यात आले नाही. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नावाजलेले आणि ऊस दर देण्यात नामाकिंत, अग्रेसर असलेल्या कारखान्यांकडून हालचाली अथवा दर जाहीर केला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या गळीत हंगामातील उसाला प्रति टन 3 हजार रुपये इतका सर्वाधिक दर सोमेश्वर कारखान्याने होता. यावेळी सोमेश्वरने निवडणुकीत विजयी पताका लावल्यानंतर हा कारखाना यंदाच्या निवडणुकीत किती दर देऊन कोंडी फोडणार, याकडे लक्ष लागले आहे. छत्रपती कारखान्याने गेल्या वर्षी हंगामात 2 हजार 393 रुपये प्रति टन दर दिला आहे. त्यामुळे हा कारखाना 2500 ते 2600 रुपयांच्या जवळपास दर देईल, अशी शक्यता आहे. माळेगाव कारखान्याने गेल्या हंगामात प्रति टन 2750 रुपये इतका दर दिला आहे. श्री विघ्नहर कारखान्याने 2551 रुपये इतका दर दिला आहे. भीमाशंकर कारखान्याने 2651 रुपये इतका दर दिला आहे. जिल्ह्यातील इतर कारखाने हे सहकारी आणि खासगी तत्वावरील आहेत. यात सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीबरोबर खासगी कारखान्यांची स्पर्धा सुरू झाली आहे. गेल्या पंधरा वर्षांत खासगी कारखान्याने सहकारी कारखानदारीला गाळप, साखर उत्पादनात काहीवेळा मागे टाकले आहे. दौंड तालुक्यात राष्ट्रवादीच्या कारखान्यांचे प्राबल्य दिसून येत आहे. दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना गुऱ्हाळावर तसेच खासगी कारखान्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस परिषदेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पहिली उचल 3300 रुपये द्यावी, असा ठराव केला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील धगधगत्या अंगार मळ्यात गळीत हंगामापूर्वी वातावरण तापले होते. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व असलेल्या या कारखान्याने राज्यात पहिली ऊस दराची कोंडी फोडली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील इतर सात ते नऊ कारखान्यांकडून सरासरी 2700 ते 3 हजार रुपये पहिली उचल जाहीर केली. त्यानंतर सांगली जिल्ह्यात (दि.28) ऊस दराची कोंडी फोडून सलामी दिली आहे. आता सातारा जिल्ह्यातही लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. या तीन जिल्ह्यात साखर उतारा जादा असल्याने दराचा रेषो जादा आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील साखर उतारा हा 11 ते 11.50 पर्यंत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून नेहमीच दरांमध्ये तफावत आढळत आहे. मात्र, याकडे शेतकरी डोळेझाक करीत ऊस गाळपास पाठवित आहे. जिल्ह्यातील ऊस शिवारात साखर सम्राट प्रबळ असल्याने दरांच्या बाबतीत नेहमीच कपात केली जात आहे. दोन कारखान्यांचा अपवाद राहणार जिल्ह्यात सरासरी 17 ते 18 सहकारी आणि खासगी साखर कारखाने आहेत. यात माळेगाव, सोमेश्वर, श्री छत्रपती, नीरा- भीमा, श्री विघ्नहर, भीमाशंकर हे कारखाने सहकारातील दर्जेदार आणि विश्वासार्हता असलेले कारखाने आहेत. तसेच खासगी कारखान्यांकडून ऊस दरात भरीव कामगिरी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिढ्यान्पिढ्या पिळवणूक ठरली आहे. यात जिल्ह्यात शेतकरी संघटना प्रभावी आणि आक्रमक नाहीत. त्यामुळे सहकारावर दबावगट करण्यात आतापर्यंत शेतकरी चळवळीला यश आले नाही. ही ऊस उत्पादकांची शोकांतिका आहे.