पुणे – शहरपाठोपाठ ग्रामीणमधील बाधित संख्या घटू लागल्याने मागील महिन्यापासून करोना मुक्तीचा दर झपाट्याने वाढलेला आहे. आतापर्यंतची सर्वाधिक करोना मुक्तीचा दर ऑक्टोबरमध्ये नोंदविण्यात आला आहे. सध्या ग्रामीणमधील करोना मुक्ती दर 97.7 टक्के इतका आहे. पुणे जिल्ह्यात मार्च 2020 मध्ये करोनाचा पहिला रूग्ण सापडला. त्यानंतर करोनाची रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मागील दीड वर्षांत करोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. त्यामध्ये लाखो नागरिक बाधित झाले असून जवळपास 19 हजार बाधितांचा मृत्यू झाला. एकीकडे बाधित आणि मृत्यूचे प्रमाण पाहिल्यानंतर जिल्ह्यातील करोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. सुरुवातील बाधित सापडण्याच्या तुलनेत करोनामुक्तीचा दर खूपच कमी होता; मात्र सप्टेंबरमधील करोनाचा उच्चांकानंतर बाधित संख्या हळूहळू खाली येऊ लागली. त्यामुळे मे महिन्यातील करोनामुक्तीचा दर 40 टक्के होता. तर ऑक्टोबरमध्ये हा दर 89 टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर करोनाची पहिली लाट ओसरू लागली. 23 डिसेंबर 2020 रोजी ग्रामीणमध्ये सर्वाधिक करोनामुक्तीचा दर नोंदविण्यात आला; मात्र त्यानंतर ओसरती लाट पुन्हा डोके वर काढू लागली. फेब्रुवारी 2021 मध्ये करोनाची दुसरी लाट आली आणि मृत्यूच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली, त्यामुळे 95 टक्क्यांपर्यंत गेलेला करोना मुक्तीचा दर 84 टक्क्यांपर्यंत खाली आला. एप्रिलमधील करोनाचा “पीक’ सपंल्यानंतर शहरातील बाधित संख्या घटू लागली; मात्र ग्रामीणमधील बाधित संख्या घट नसल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढलेली होती. साधारण जून महिन्यांपासून ग्रामीणमधील ग्रामीण संख्या घटली आणि करोना मुक्तीचा दर वाढू लागला. जुलैमध्ये पहिल्या लाटेतील करोना मुक्तीचा उच्चांक मोडला. तर आज ऑक्टोबरमध्ये करोना मुक्तीचा दर सर्वाधिक 97.7 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला दिलासा मिळला आहे.