नागपूर : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असतानाच विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती रखडल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उबाठा) ने भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे केले असले, तरी महायुती सरकारने एक वर्ष उलटूनही ही नियुक्ती केलेली नाही. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांना थेट २०२९ ची वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले, आपण लोकशाहीत राहतो. संविधान आणि कायद्याने विरोधी पक्षनेते होण्यासाठी आवश्यक संख्याबळ ठरवून दिले आहे. जनतेने तुम्हाला सरकार तर सोडाच, पण विरोधी पक्षनेतेपदासाठीही पुरेसे आमदार दिलेले नाहीत. महायुती सरकार जनतेच्या कौलाचा अनादर करू शकत नाही, असं पडळकर यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, विरोधकांनी आता २०२९ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करावी. जनतेमध्ये जा, मेहनत करा आणि किमान विरोधी पक्षनेतेपद मिळेल एवढे तरी आमदार निवडून आणा. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवले, तरी जनतेने त्यांना विरोधी पक्षनेतेपदासाठीही संख्याबळ दिले नाही, हे त्यांनी समजून घ्यावे, असंही त्यांनी म्हटले आहे. पडळकरांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकार विरोधी पक्षनेतेपद २०२९ पूर्वी देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे हे पद रिकामेच राहण्याची शक्यता बळावली आहे.