बेल्हे : आळेफाटा (ता.जुन्नर) हद्दीमधील सांडपाण्याचा प्रश्न गंभीर असून हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. त्यामुळे या गटारीचा प्रश्न मार्गी कधी लागणार असा प्रश्न नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.
आळेफाटा हे शहर दिवसेंदिवस वाढत आहे. आळेफाटा हे शहर आळे आणि वडगाव आनंद या दोन ग्रामपंचायतीच्या हद्दीत विभागले गेलेले आहे. या दोन्हीही हद्दीमधील सांडपाणी हे येथील पोलिस ठाण्याच्या मागून येणाऱ्या गटारीमधून पुढे चौगुले वस्ती व तेथून पुढे ते चाळकवाडी येथील ओढ्यात सोडण्यात आले आहे. हे गटर संपूर्ण उघडेच आहे त्या गटारात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्यामुळे ही गटारे तुंबलेली आहेत. त्यामुळे येणाऱ्या दुर्गंधीचा येथील ७० स्थानिक कुटुंबाला व येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे.
याबाबत या गटाराला पाईप टाकून बंदिस्त करावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे. पुढे चौगुलेवस्तीमध्ये तर पावसाळ्यात या गटाराची अत्यंत वाईट अवस्था झालेली असते. तेथील रहिवाशांना दूर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक या गटाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करत असल्याचे येथील ग्रामस्थ बाळासाहेब चौगुले,बाळासाहेब कुऱ्हाडे यांनी सांगितले.