पिंपरी | धोकादायक होर्डिंग्ज कधी हटवणार ?

देहूरोड, (वार्ताहर) – मुकाई चौक ते माळीवाले नगर दरम्यान बीआरटी मार्गालगत धोकादायक होर्डिंग्ज चे सांगाडे आहेत. सध्या पावसाळ्याचा कालावधी असून कधी वादळी वारा असतो. अशात हे होर्डींग्ज कोसळून अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे हे होर्डिंग्ज हटवावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
मुंबईतील घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर राज्यभरात प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्ज विरोधात कारवाई सुरू केली. जे होर्डिंग्ज अनधिकृत आणि अयोग्य होते, त्यावर कारवाई करत काढून टाकले. तसेच होर्डिंग्ज धारकांना नोटीसा बजावल्या होत्या. परंतु या कारवाईनंतरही शहरात अनेक होर्डिंग्ज ‘जैसे थे’ राहिलेल्या दिसतात. त्या धोकादायक असूनही कारवाई होताना दिसत नाही.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संबधित विभागाने अशा धोकादायक होर्डिंग्ज सांगाड्यांवर योग्य कारवाई करून ती हटवावीत. होर्डिग अधिकृत की अनधिकृत यात अडकून पडण्यापेक्षा हे होर्डिंग हटवावे, अशी मागणी स्थानिक व्यवसायिक करत आहेत.





