पुणे -महानगरपालिका कचरा वेचकांचा विमा कधी उतरविणार, असा सवाल करीत विमा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतीतर्फे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्याकडे केली आहे. कचरा वेचकांच्या शिष्टमंडळाने खेमणार यांना याबाबतचे निवेदन दिले. पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने 2015 आणि 2017 मध्ये कचरा वेचकांचा विमा उतरविण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर आम आदमी विमा योजनेचा हप्ता ही पालिकेने भरला. कचरा वेचून पोट भरणाऱ्यांना विमा लागू झाला. मात्र, त्यानंतर आम आदमी योजना रद्द करून त्याजागी प्रधान मंत्री जीवन ज्योत बिमा योजना आणि प्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजना अस्तित्वात आल्या. परंतु, मागील आणि आताच्या प्रशासनाशी वारंवार संवाद साधूनही त्याची अमलबजावणी झाली नाही. करोनाकाळात कष्टकऱ्यांना विमा विरहित काम करावे लागत आहे. यासंदर्भात प्रस्ताव तयार करून मान्यता घेण्याचे आदेश खेमनार यांनी घन कचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहेत.