विद्यार्थी शैक्षणिक साहित्य घेणार कधी? शाळा सुरू होऊन महिना उलटला

पुणे – शालेय वर्ष सुरू होऊन तब्बल महिनाभर झाला असतानादेखील अनेक विद्यार्थ्यांना अद्याप शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी महापालिकेकडून देण्यात येणारे डीबीटीचे अनुदान मिळालेले नाही.
विशेष म्हणजे महापालिका आयुक्तांकडून दोन आठवड्यांपूर्वी या साहित्यांच्या दरांना मान्यता दिली असली तरी शिक्षण मंडळाकडून विद्यार्थीनिहाय किती रक्कम द्यायची याचा प्रस्तावच तयार केलेला नसल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक साहित्यास विलंब झाल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी महापालिकेकडून शहरात शाळा चालविल्या जातात. शहराच्या वेगवेगळ्या भागांत अडीचशेहून अधिक प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमधील सुमारे लाखभर मुलांना शालेय गणवेश, रेनकोट, शैक्षणिक साहित्य, बूट यासाठी महापालिकेकडून अनुदान दिले जाते.
साल २०१७ पूर्वी महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून या साहित्याची खरेदी केली जायची.
मात्र, या खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराचे आरोप होत असल्याने महापालिकेने त्यानंतर ही साहित्य खरेदी करण्याऐवजी मुलांना लागणाऱ्या साहित्याचे दर मागवून त्यानुसार, मुलांना थेट बॅंक खात्यात या साहित्याचे अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, त्यानंतर अद्यापपर्यंत कधीही शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना हे अनुदान मिळालेले नाही.
प्रत्येक वर्षी पटसंख्येचे कारण देत शिक्षण विभागाकडून हे अनुदान देण्यास विलंब केला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, अनेक मुले शैक्षणिक साहित्याअभावी अथवा जुने साहित्य वापरून शिक्षण घेत असून, महापालिकेने तातडीने अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.





