बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी मंगळवारी पुन्हा ऐक्याचे दर्शन घडवले. त्यांच्यात चार दिवसांत दुसऱ्यांदा ब्रेकफास्ट पे चर्चा झाली. त्यानंतर कॉंग्रेस श्रेष्ठी ठरवतील तेव्हा शिवकुमार मुख्यमंत्री बनतील, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले. त्यातून त्यांनी मुख्यमंत्री बदल करायचा की नाही याविषयीच्या निर्णयाचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात ढकलल्याचे स्पष्ट झाले. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या कर्नाटकात सत्तासंघर्ष, मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र मागील काही दिवसांत पुढे आले. त्यामुळे मोठा राजकीय संभ्रम निर्माण झाला. तो दूर करण्यासाठी कॉंग्रेस श्रेष्ठींनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना एकमेकांशी चर्चा करण्याची सूचना केली. त्यानंतर सिद्धरामय्या यांचे निमंत्रण स्वीकारत त्यांच्या निवासस्थानी शिवकुमार यांनी शनिवारी न्याहारी केली. त्या न्याहारीने दोघांमधील वाढती दरी दूर झाल्याचे समोर आले. दोघांमधील दुसरी ब्रेकफास्ट पे चर्चा शिवकुमार यांच्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती साेमवारी मिळाली. मात्र, पुन्हा दोन्ही नेत्यांची भेट होणार का याविषयी प्रारंभी संभ्रमाची स्थिती होती. पण, दोघांनी ठरल्याप्रमाणे पुन्हा एकत्र येत न्याहारी केली. साहजिकच, न्याहारी भेटीनंतर पत्रकारांनी सिद्धरामय्या यांना गाठून शिवकुमार यांच्या मुख्यमंत्री बनवण्याविषयी प्रश्न केला. तो निर्णय कॉंग्रेस श्रेष्ठींच्या अखत्यारीतील असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. तसेच, श्रेष्ठींचा निर्णय आम्हा दोघांनाही मान्य असेल, या भूमिकेचाही पुनरूच्चार केला.