बॉलीवूडमध्ये सोमवारी शाहरुख खानसोबतच अभिनेत्री ईशा देओलनेही बर्थ डे सेलिब्रेशन केले. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशानेही चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमाविले होते, पण तिला आई-वडिलांप्रमाणे यश मिळविता आले नाही. आपल्या छोट्याश्या इनिंगनंतर तिने विवाह केला.
ईशाचे वडील धर्मेंद्र यांनी दोन लग्न केली आहेत. पहिली पत्नी प्रकाशपासून त्यांना सनी देओल, बॉबी देओल, अजिता आणि विजेता अशी चार मुले आहेत. तर दुसरी पत्नी हेमा मालिनीची ईशा आणि आहना देओल आहेत.
धर्मेंद्रच्या पहिली पत्नीच्या कुटुंबीयांनी कधीही दुसऱ्या लग्नाबाबत कोणतेही विवादास्पद वक्तव्य केले नाही; परंतु हेमा आणि त्यांच्या मुलींना या कुटुंबात प्रवेशही दिला नाही. तसेच ईशा आणि आहनाच्या लग्नातही या कुटुंबातील कोणताही सदस्य उपस्थित राहिला नाही. दरम्यान, असे म्हटले जाते की, सनी देओल हा आपल्या बहिणींच्या जवळ आहे; परंतु याबाबत त्याने कधीही जाहीरपणे सांगितले नाही. ईशा ही पहिली व्यक्ती आहे, जिला सनी देओलमुळे एकदा धर्मेंद्रच्या घरी जाण्याची संधी मिळाली होती.
धर्मेंद्रचे भाऊ आणि अभय देओलचे वडील अजित देओल 2015 मध्ये आजारी होते. ईशा ही त्यांच्या खूप जवळची होती. अभयसोबतही ईशाचे चांगले संबंध आहेत. त्यावेळी ईशाला अजित काकांना भेटायचे होते; परंतु त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याने तिला जाता येत नव्हते. तेव्हा ईशाने सनी देओलला फोन करून अजित काकांना भेटण्याबाबत सांगितले. यानंतर सनीने या भेटीची संपूर्ण व्यवस्था केली होती.