Pimpri : घर कधी देता घर ?

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू नागरिकांसाठी, कामगारांसाठी १० हजार घरांची निर्मिती करावी, रावेत येथील पात्र लाभार्थी यांना निश्चित किमतीत म्हणजे ६ लाख ९५ हजार रु. किमतीत किवळे गृहप्रकल्पात घरे देण्यात यावीत, लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान देण्यात यावे या मागण्यांसाठी कष्टकरी संघर्ष महासंघ तर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात महापालिकेसमोर घर कधी देता घर ? आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महिलाध्यक्ष वृषाली पाटणे, माधुरी जलमूलवार, सदस्य किरण साडेकर, सलीम डांगे, नरसिंग माने, माऊली भोसले, गजानन बाजड, कालिदास गायकवाड, सुनील भोसले, राजेश माने, संभाजी वाघमारे, जरीता वाठारे, तुकाराम माने, सखाराम केदार, अंबादास जावळे, अंजुबाई राठोड, जितेंद्र महाजन, संदीप कांबळे, भागवत नागपुरे, अमृत पाटील, शुभांगी चव्हाण, शमशुद्दीन शेख, युनूस बेग, मंगेश पालके, अश्विनी मालुसरे, नंदू आहेर, बरगल्ली गावडे उपस्थित होते.
नखाते म्हणाले की शहरात घरांची गरज असणाऱ्या नागरिकांची, कामगारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. महापालिकेने निर्माण केलेली घरांची संख्या कमी असून १० हजारांपेक्षा अधिक घरांच्या निर्मितीची गरज आहे. ऑगस्ट २०२० मध्ये महापालिकेने रावेत येथील गृहप्रकल्पासाठी ९३४ लाभार्थी निश्चित करण्यात आले . मात्र ५ वर्षे झाले तरी हा प्रकल्प झाला नाही.
याच लाभार्थ्यांना त्याच किमतीत घरे न देता किवळे येथील प्रकल्पामध्ये १३ लाख रुपये किमतीमध्ये म्हणजे दुप्पट किमतीने घरे देण्याचा घाट घातला असून हे चुकीचे आहे. ठरलेल्या दरातच घरे देण्यात यावी. पंतप्रधान आवास योजनेस मुदतवाढ दिल्याने हा लाभ ही या लाभार्थ्यांना देण्यात यावा तसेच डुडुळगाव येथील गृह प्रकल्पाची सोडत त्वरित काढण्यात यावी आदी मागण्या घेऊन शिष्टमंडळाने उपायुक्त अण्णा बोदडे, प्रकल्प कार्यकारी अभियंता अनघा पाठक यांचेशी चर्चा केली. या विषयावरती लवकरच आयुक्तांशी चर्चा बैठक होणार आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणा देत आंदोलनाला सुरुवात झाली मनपा भवनासमोरही आंदोलकांनी घर कधी देता घर ? मनपाच्या चुकामुळे आम्हाला भुर्दंड कशासाठी ? ७ लाखाचे १३ लाख कसे झाले ? आवास योजना आहे की भास योजना ? ५ वर्षे झाले अजून किती प्रतीक्षा करावी ? अशा घोषणा दिल्या.





