लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देशभरात गव्हाची कापणी जोरदार सुरू

नवी दिल्ली – संपूर्ण देशभरामध्ये “कोविड-19’चा उद्रेक झाल्यामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळातही देशाच्या सर्व भागांमध्ये गव्हाच्या कापणीचे काम जोरदार सुरू आहे. सध्या खरिपाच्या पिकांची कापणी, मळणी अशी कामे सुरू आहेत. देशातल्या विविध राज्यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशात 98-99 टक्के, राजस्थानात 92-95 टक्के, उत्तर प्रदेशमध्ये 85-88 टक्के, हरियाणात 55-60 टक्के, पंजाबात 60 -65 टक्के आणि उर्वरित राज्यात सरासरी 87 -88 टक्के गव्हाच्या कापणी-काढणीचे काम पूर्ण झाले आहे.
रब्बी हंगामामध्ये किमान समर्थन मूल्य योजने अंतर्गत शेतकरी बांधवांकडून डाळी आणि तेलबियांची खरेदी सध्या केली जात आहे. यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये खरेदी सुरू आहे.
आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमधून 72,415.82 मेट्रिकटन हरभरा डाळीची खरेदी करण्यात आली. तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि ओडिशा या सात राज्यांमधून 1,20,023.29 मेट्रिकटन तूरडाळीची खरेदी करण्यात आली. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यांमधून 1,83,400.87 मेट्रिकटन मोहरीची खरेदी करण्यात आली.
दरम्यान एनएचबी म्हणजेच राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने देशभरातील 618 एनएचबी मान्यताप्राप्त रोपवाटिकांमधून फळे आणि भाजीपाला यांच्या उपलब्ध रोपांविषयीची माहिती जमा केली आहे. राज्य फलोत्पादन अभियान, एनएचबीची राज्यांमध्ये असलेली कार्यालये यांच्याकडे उपलब्ध रोपांची माहितीही आहे. एनएचबीच्या संकेतस्थळावर www.nhb.gov.in
गरजेची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.





