नावात काय आहे?

– सागर ननावरे

नावात काय आहे? असा प्रश्न शेक्‍सपिअरने विचारला होता. हे सांगताना त्याने एक सुंदर दाखलाही दिला होता. तो म्हणाला होता की,जर गुलाबाच्या फुलाला गुलाब न म्हणता इतर नाव दिले तर त्याने गुलाबाचा सुगंध कमी होईल काय?

एका अर्थाने त्याचे हे म्हणणे जरी योग्य असले तरी मोठे होऊन चांगले नाव कमव हे आपण अगदी बालवयापासून ऐकत आलेलो आहोत. नाव कमविणे हे ध्येय आपल्या प्रत्येकाचे असते. कारण नाव ही आपली ओळख असते. कोणत्याही क्षेत्रात नाव हे त्या व्यक्‍तिमत्त्वाचा एक ब्रॅंड असते. नावाने अनेक लोकांना मोठी प्रसिद्धी, पैसा, वलय आणि सामाजिक आदर प्राप्त होत असतो.

सध्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यात पक्ष, पक्षाची चिन्हे आणि पक्षाच्या अजेंड्या पलीकडेही मते मिळत असतात. आणि तो मते मिळवून देणारा फॅक्‍टर म्हणजे उमेदवाराचे नाव. बहुतेक ठिकाणी पक्षापेक्षाही उमेदवाराच्या कर्तृत्वावर आणि नावलौकिकावर मते मिळत असतात. अगदी पूर्वापारपासून व्यक्तीच्या वलयाला केंद्रस्थानी ठेवून निवडणुका जिंकल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु राजकारणात अनेकदा व्यक्‍तीचे नाव हेच त्याच्यासाठी डोकेदुखी ठरत असते. समान नावांची व्यक्‍तिमत्त्वे एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवीत असतात अशावेळी मतांत विभाजन होत असते.

बरेचदा एखाद्या तगड्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी विरोधक त्याच नावाच्या एखाद्या सर्वसामान्य उमेदवाराला निवडणुकीत उभे करतात. जेणेकरून नावातील साधर्म्याने त्या तगड्या उमेदवाराची बरीच मते सर्वसामान्य उमेदवाराकडे वळविली जाऊ शकतात. परिणामी विरोधक त्याचा फायदा उठवितात.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडोदरा मतदारसंघात नरेंद्र बाबूलाल मोदी नामक व्यक्तीनेही फॉर्म भरला होता. नरेंद्र मोदी यांच्या नावाचा आणि लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी हे केले होते. मात्र, त्यानंतर नरेंद्र बाबूलाल मोदी यांनी माघार घेऊन काही अंशी का होणारे मतविभाजन टाळले होते.

अगदी त्याचप्रमाणे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत छत्तीसगढ़च्या महासमुंद लोकसभा मतदारसंघातून बीजेपीचे चंदूलाल साहू हे उमेदवार म्हणून उभे होते. त्यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी त्यावेळी चंदू नावाचेच तब्बल 10 उमेदवार उभे केले होते. मतदारांना गोंधळात टाकून निवडणूक जिंकण्याचा विरोधकांचा मानस होता. या निवडणुकीत मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले आणि चंदूलाल साहू यांनी केवळ 1217 च्या मताधिक्‍याने विजय मिळविता आला. विशेष म्हणजे अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या चंदूनामक 10 उमेदवारांनी 70,000 हुन अधिक मते मिळविली होती.

त्याचप्रमाणे मथुरा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार सिनेअभिनेत्री हेमा मालिनी यांच्या विरोधात याच नावाची अपक्ष महिला उमेदवार उभी होती. मात्र अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मोठ्या फरकाने बाजी मारली.

महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास याच नामसाधर्म्याने रायगड लोकसभा मतदारसंघाचा निकाल बदलला होता. राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याच नावाच्या आणखी एका व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रायगडमध्ये सुनील तटकरेंना जोरदार फटका बसला होता. त्यांचे नामसाधर्म्य असणाऱ्या अपक्ष उमेदवाराने 9849 मते घेतली होती. आणि सुनील तटकरे याना केवळ 2110 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचप्रमाणे हिंगोली लोकसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांच्या व्यतिरिक्त अन्य दोन सुभाष वानखेडेंना विरोधकांनी लोकसभेच्या रिंगणात उतरविल्याने शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना अवघ्या 1632 मतांनी पराभूत व्हावं लागलं होत. कारण नामसाधर्म्य असणाऱ्या या दोन सुभाष वानखेडेंनी तब्बल 12 हजार 544 मतदान खाल्ले होते. त्याचप्रमाणे हिंगोली लोकसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांच्या व्यतिरिक्त अन्य दोन सुभाष वानखेडेंना विरोधकांनी लोकसभेच्या रिंगणात उतरविल्याने शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना अवघ्या 1632 मतांनी पराभूत व्हावे लागले होते. कारण नामसाधर्म्य असणाऱ्या या दोन सुभाष वानखेडेंनी तब्बल 12 हजार 544 मतदान खाल्ले होते.

यंदाच्या 2019 च्या निवडणुकीतही युतीच्या मतांचे विभाजन व्हावे म्हणून सुभाष वानखेडे नामक इतर पाच सुभाष वानखेडे उमेदवार म्हणून लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. स्वतःच्या नावाचा ब्रॅंड असतानाही केवळ नामसाधर्म्यामुळे आजपर्यॅंत अनेकांचा बॅंड वाजला आहे. हे नावकरीच उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरत आहेत आणि म्हणूनच निवडणुकांचा विचार करता नावात काय आहे ? या प्रश्‍नाऐवजी नावात काय नाही… ? हे म्हणणे वावगे ठरणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.