राज्यमंत्री शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेणार सभा
दिवे- पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (दि. 15) सासवडला येणार आहेत. पुरंदर विधानसभा मतदारसंघातील सर्वांत कळीचा मुद्दा असलेल्या गुंजवणी आणि विमानतळ प्रकल्पाबाबत ते काय बोलतात याचे पुरंदरमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. सासवडच्या पालखीतळ मैदानावर ही सभा संपन्न होणार आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांचा पुरंदर हवेलीच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे.
तालुक्याला गुंजवणी, आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय कृषी बाजार, राष्ट्रीय महामार्ग, पुरंदर उपसा आणि जनाईचे अवघ्या 19 टक्के रक्कमेत मिळणारे पाणी शिवतारे यांच्या कल्पनेतील विकासकामांना मूर्त स्वरूप आणण्यात या दोघांचे योगदान उल्लेखनीय आहे. या सभेला मुख्यमंत्र्यांसोबतच पुण्याचे खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह महायुतीचे अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राज्यात भाजप शिवसेना व महायुतीचेच सरकार येणार हे निश्चित असल्यामुळे नामदार शिवतारे यांच्या माध्यमातून पुरंदरला आणखी मोठा निधी मिळावा आणि सध्याचे मोठे प्रकल्प मार्गी लागावेत अशी अपेक्षा आहे. जेजुरी शहराच्या संपूर्ण विकासासाठी ना. शिवतारे यांच्या माध्यमातून 250 कोटींचा आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. त्याबाबत मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडेही लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.