महायुतीचं ‘ऑपरेशन टायगर’ काय आहे? उद्धव ठाकरे सेना, काॅंग्रेसला गळती लागणार?

Operation Tiger : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात मोठी राजकीय खळबळ उडणार असल्याचे सांगितले जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दाव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याबाबत चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांचा गट आणि काँग्रेसमधील अनेक आमदार आणि खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. आज 31 जानेवारीला भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी ऑपरेशन टायगरला दुजोरा दिला आहे. मात्र, उद्धव गट आणि काँग्रेस या दोघांनीही एकही आमदार-खासदार कुठेही जाणार नसल्याचे आधीच स्पष्टपणे सांगितलेले आहे.
ऑपरेशन टायगरची चर्चा कशी सुरु झाली?
खरंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 ते 24 जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत देखील दावोसला गेले होते. यादरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी पूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती. उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळे होणार होते. त्यांच्या सोबत 20 आमदारही होते, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. महायुतीचं सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आडून बसले होते, त्यामुळे उदय सामंत यांना घेऊन सरकार बनवण्याचा भाजपचा प्लान होता, असेही राऊत म्हणाले. त्यानंतर उदय सामंत यांनीही पलटवार केला आणि पुढील काही दिवसांत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि पक्षसंघटनेतील अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करून आमच्याकडे प्रवेश करतील, असे सामंत यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे तीन खासदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांचा प्रवेश थांबला आहे. ऑपरेशन धनुष्यबाणसह “ऑपरेशन टायगर’ देखील आम्ही राबवत आहोत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि माजी आमदार आमच्याकडे येतील. याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यापासून होणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि नंतर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागातील अनेक माजी आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करतील, असा दावा उदय सामंत यांनी केला. तेंव्हापासून ऑपरेशन टायगरची जास्त चर्चा सुरु झाली.
आम्ही फोडोफोडीचा प्रयत्न करत नाही. मात्र संघटनात्मक आणि विकासात्मक ताकद नेतृत्वाकडून दिली जात नसल्यानेच उद्धव ठाकरेंच्या पक्षातील खासदार आणि इतर पदाधिकारी आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक आहेत, असंही उदय सामंत यांनी म्हटले.
“माझ्यात आणि एकनाथ शिंदेंमध्ये फूट पडू शकत नाही”
“बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत चांगली भूमिका मांडतील, त्यांचे समर्थन आम्ही करणार आहोत. ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे, ते माझ्या नावाचा वापर करत आहेत. असल्या बालिश पद्धतीने माझ्यात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोणीही फूट पाडू शकत नाहीत. दावोसला असताना ज्या लोकांनी माझ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले, माझा राजकीय अस्त व्हावा, यासाठी प्रयत्न केले त्यांच्याबाबत मी एवढेच सांगू इच्छितो की, ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहे. वारंवार त्यांना फोन करत आहेत. आमचे आता पुढे राजकीय भवितव्य काय असेल, असे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले,” असा गौप्यस्फोटही उदय सामंत यांनी केला होता.
गिरीश महाजन यांचा ‘ऑपरेशन टायगर’ला दुजोरा –
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येत्या काही दिवसातच महाविकास आघाडीला गळती लागल्याचे दिसेल, असे 31 जानेवारीला म्हंटले आहे. ते म्हणाले, शिवसेना ठाकरे गटाचे, कॉंग्रेस पक्ष असो किंवा शरद पवार गटाचे आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांसह अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. ते सर्व महायुतीत यायला इच्छुक आहेत. दररोज संपर्क सुरू आहे. नगरसेवकांना मुख्य प्रवाहात यायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. येत्या काही दिवसातच याची सर्वांना प्रचीती आल्याचे दिसेल, असा इशारा देखील गिरीश महाजन यांनी दिला आहे.
पुण्यातील हे नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात?
शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली 5 माजी आमदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असून ते उदय सामंत यांच्या संपर्कात असल्याची माहिती मराठी वृत्तवाहिन्यांनी वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने गुरुवारी (दि. 30) दिली. त्यामध्ये, 2 काँग्रेस नेते आणि 4 माजी आमदार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचाही ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर, काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना बैठकीत नाराज होऊन उठून गेलेले चंद्रकांत मोकाटेही ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर व हुसेन दलवाई यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आजच भेट घेतली. काँग्रेसचे दोन नेते एकनाथ शिंदेच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, हुसेन दलवाई यांनी पक्षप्रवेशाचे वृत्त फेटाळले असले तरी रविंद्र धंगेकर यांच्या भेटीमुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा कायम आहे.
शिंदेंच्या सेनेत संपर्कात असलेल्याची चर्चा असलेल्या नेत्यांची नावे-
1) रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे माजी आमदार
2) महादेव बाबर, ठाकरे गटाचे माजी आमदार हडपसर
3) चंद्रकांत मोकाटे, कोथरूडचे माजी आमदार ठाकरे गट
रत्नागिरी
1) गणपत कदम, रत्नागिरीचे माजी आमदार ठाकरे गट
संगमेश्वर, अहिल्यानगर
1) सुभाष बने, संगमेश्वर माजी आमदार ठाकरे गट
नवी मुंबई
1) रमाकांत म्हात्रे, कॅाग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर
आठवडाभरात कोणी-कोणी सोडली उद्धव ठाकरेंची साथ ?
-उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला (UBT) सोमवारी (27 जानेवारी) मोठा झटका बसला. पक्षाच्या ज्येष्ठ महिला नेत्या राजुल पटेल यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत (यूबीटी) प्रदीर्घ काळ काम करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. बीएमसी निवडणुकीपूर्वी राजुल पटेल यांनी पक्षापासून फारकत घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राजुल पटेल यांना वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. मात्र त्यांच्या जागी पक्षाने हारून खान यांना उमेदवारी दिली. पटेल ह्या तीन वेळा नगरसेवक राहिल्या आहेत. महापालिकेच्या विविध समित्यांवर त्यांनी अनेक पदांवर काम केले आहे. शिवसेनेच्या (UBT) सर्वात ज्येष्ठ महिला नेत्यांपैकी एक म्हणून त्या ओळखल्या जात होत्या आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी संघटक म्हणून काम केले होते. 2019 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती. वर्सोव्यात त्यांचा दबदबा असल्याचे मानले जाते.
-जालन्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडले. उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांनी 25 जानेवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आसाराम बोराडे यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने शिवसेनेला मराठवाड्यात मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जाते. आसाराम बोराडे यांनी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह बोराडे यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. आसाराम बोराडे हे विधानसभा निवडणुकीमध्ये परतूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार होते. आसाराम बोराडे जालना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख देखील होते. या विधानसभा निवडणुकीत थोड्याच मतांनी आसाराम बोराडे यांचा पराभव झाला होता. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जालना मनपाचे काँग्रेसच्या 8 नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला.
नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडले. विधानसभा निवडणुकीत पराभव झालेले नांदेड लोकसभा संघटक एकनाथ पवार यांनी ठाकरे गटाच्या नेत्यावर गंभीर आरोप करत 20 जानेवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला. ”शिवसेना हा दलालाचा पक्ष आहे, मातोश्रीच्या अवती भोवती राहणारे विनायक राऊत, बबन थोरात आणि सुषमा अंधारे हे पैसे घेऊन पक्षाचं तिकीट वाटप करत आहेत”, असा आरोप एकनाथ पवार यांनी केला. दरम्यान, पवार हे लवकरच भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती आहे. दोन वर्षापूर्वी त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांच्यावर लोकसभा संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार यांना लोहा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेच्या एकाही नेत्यांनी सभा घेतली नाही. त्यामुळे पवार हे नाराज होते. या पराभवानंतर एकनाथ पवार हे शिवसेना पक्ष सोडणार अशी चर्चा देखील सुरु होती. अखेर त्यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार?
ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे अनेक दिवसांपासून नाराज आहेत. ते लवकरच उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करणार असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व महत्त्वपूर्ण नेते राजन साळवी हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 3 फेब्रुवारी रोजी राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
राजन साळवी हे कट्टर शिवसैनिक आहेत. रत्नागिरीतील राजापूर मतदारसंघाचे ते माजी आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांचे ते खंदे समर्थक आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केले तेव्हा साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले. विद्यार्थीसेनेपासून त्यांनी राजकीय क्षेत्रात काम सुरु केले. राजन साळवी हे शिवसेनेचे रत्नागिरीतील पहिले नगराध्यक्ष आहेत. 2009, 2014, 2019 सलग तीनवेळा ते राजपूर विधानसभेमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते.
जानेवारी 2024 मध्ये पडली होती एसीबीची धाड –
राजन साळवी यांच्या घरावर जानेवारी 2024मध्ये एसीबीने धाड टाकली होती. साळवी यांच्या घरी, त्यांच्या भावाच्या घरी आणि हॉटेलवर एसीबीने धाड टाकली. उत्पन्नापेक्षा 118 टक्के जास्त संपत्ती असल्याचा आरोप साळवी यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान, याआधीही सहा वेळा साळवी यांची चौकशी झाली होती.




